लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आधुनिक युगात मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यासह तत्सम बाबींचा उद्रेक झाला असला तरी वाचनाला आजही पर्याय नाही. रोजचे वृत्तपत्र वाचले तरी ज्ञानात मोलाची भर पडते. पुस्तक वाचनाने जीवनात संघर्षाची प्रेरणा मिळते. आज किंडल, ई-बुक, विकिपीडियाच्या माध्यमातून वाचनासाठी साहित्य उपलब्ध होत आहे. त्याचा आधार घेऊन प्रत्येकाने जीवनात अपडेट रहावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.राज्यशासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने तथा वाशिम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत येथील एस.एम.सी. शिक्षण संकुलच्या स्व. सत्यनारायण जोशी सभागृहात आयोजित ‘ग्रंथोत्सव २०१७’ च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.‘महत्त्व गॅझेटियर’चे या विषयवार बोलताना डॉ. दी.प्र. बलसेकर म्हणाले, वाशिम जिल्ह्याच्या गॅझेटियरचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यादृष्टीने माहिती संकलनाचे काम सुरु असून गॅझेटियरच्या अनुषंगाने वाचकांना जिल्ह्याच्या सर्वांगीण माहितीचा ठेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्हा गॅझेटियर निर्मितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.अमरावती येथील लेखिका रजिया सुलताना यांनी ग्रंथ वाचन व लेखन याविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, लेखक हा लेखक असतो. त्याला कोणतीही जात, धर्म नसतो. तसेच त्याचे लेखनही कोणत्या जाती, धर्माच्या चौकटीत बसवता येत नाही. त्यामुळे वाचकांनी या लिखाणाचा निखळ आस्वाद घेतला पाहिजे. वाचनाने विचार प्रगल्भ बनतात व अनुभव समृद्ध होतात. ग्रंथ आपल्याला विचार देतात. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथांवर प्रेम करायला हवे, असे सुलताना यांनी सांगितले. कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी ग्रंथ लेखनाच्या अनुषंगाने लेखकाची भूमिका मांडली. लेखकाने ग्रंथ लिहिताना त्याचा वाचकांना काय फायदा होईल, याचाही विचार केला पाहिजे. लोकांमध्ये वाचनाची आवड होणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालयांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.प्रा. हरिभाऊ क्षीरसागर म्हणाले, वाचन हे आपणास तारते. त्यामुळे वाचन संस्कृती वाढविणे आवश्यक आहे. चांगले समाजमन घडविण्यासाठी चांगल्या ग्रंथांचा प्रसार होणे आवश्यक असून त्यासाठी ग्रंथोत्सव उपयुक्त ठरेल, असा आशावाद प्रा. क्षीरसागर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी आभार मानले. यावेळी आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पुस्तक वाचनाने जीवनात संघर्षाची प्रेरणा मिळते - मोक्षदा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 3:14 PM
आज किंडल, ई-बुक, विकिपीडियाच्या माध्यमातून वाचनासाठी साहित्य उपलब्ध होत आहे. त्याचा आधार घेऊन प्रत्येकाने जीवनात अपडेट रहावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.
ठळक मुद्दे'ग्रंथोत्सव २०१७’ चे थाटात उद्घाटन