तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी मागितली चार हजाराची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 04:28 PM2020-11-08T16:28:17+5:302020-11-08T16:30:26+5:30
Washim Crime News पोलिसांनी पिंपळशेंडा (ता.मालेगाव) येथील तक्रारदारास चार हजाराची लाच मागितली.
किन्हीराजा/वाशिम : किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या भांडणाच्या प्रकरणात प्राप्त तक्रारीवर पुढील कारवाई न करण्यासाठी पोलिसांनी पिंपळशेंडा (ता.मालेगाव) येथील तक्रारदारास चार हजाराची लाच मागितली. ८ नोव्हेंबर रोजी किन्हीराजा येथील एका हॉटेलमध्ये पंचासमक्ष लाच स्विकारली असून, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन पोलिसांसह एका खासगी इसमाला ताब्यात घेतले.
तक्रारदाराची आई व चुलत भावाच्या पत्नीत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याप्रकरणी तक्रारदाराच्या चुलत भावाच्या पत्नीने पोलिसात तक्रार केली. या तक्रारीवर पुढे कोणतीही कारवाई न करण्याकरीता पोलीस हवालदार गणेश गणपत नरवाडे (५१) व पोलीस कॉन्स्टेबल संतोष जगदेव गिºहे (३९) यांनी दोघेही रा. मालेगाव चार व्यक्तींचे मिळून एकूण चार हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ८ नोव्हेंबर रोजी किन्हीराजा येथील एका हॉटेलमध्ये संतोष गिºहे यांनी लाचेची रक्कम ही खासगी इसम शुभम रमेश तिवारी (२१) रा. किन्हीराजा याच्याकडे देण्यास तक्रारदाराला सांगितले. पंचासमक्ष आरोपीने लाचेची रक्कम स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपींविरूद्ध कलम ७, १२ लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी अमोल इंगोले व पथकाने पार पाडली.