कोंडोलीवरून मानोराकडे येणाऱ्या पारवा, मोहगव्हान, आसोला, आनंदवाडी या चार गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच शेतकऱ्यांना पेरणीकरिता शेतात जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. सदर पुलाचे काम सुमारे २००० मध्ये केले होते, त्यानंतर या कामाच्या दुरुतीसाठी काही निधी मंजूर केला होता. सद्य:स्थितीत दुरुस्तीचे काम कंत्राटदार करीत असल्याची माहिती मिळाली. काम करीत असताना पुलाशेजारी खड्डा खोदून त्यात मुरूम भरला होता. मात्र पाण्याच्या प्रवाहात मुरुमासह पुलाची एक बाजू वाहून गेली. ज्या यंत्रणेने हे काम केले ते अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कार्यवाही करावी व सदर पुलाचे काम तत्काळ व दर्जेदार करावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. पूल वाहून गेला असे कळताच तहसीलदार शारदा जाधव, गट विकास अधिकारी जयश्री वाघमारे, बांधकाम विभागाचे अभियंता मालानी, घाटगे यांनी घटनास्थळी भेट दिली.
...................
शेतजमीन गेली खरडून
रिसाेड : तालुक्यात काही भागात दमदार पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य केलेल्या शेतीला झालेल्या धडक्याच्या पावसाने धुरे बंधाऱ्यावरील बांध, वळणे फुटून मोठे नुकसान झाले.
पेरणीआधीच शेतकऱ्यांना अधिकचे काम लागल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर माेठे संकट काेसळले आहे.