केंद्रीय पथकाकडून वाशिम जिल्ह्यातील पीक नुकसानाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 04:26 PM2019-11-24T16:26:14+5:302019-11-24T16:26:20+5:30
डॉ. आर.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्राची रविवार, २४ नोव्हेंबर रोजी पाहणी करून बाधीत शेतकºयांशी संवाद साधला.
बाधीत शेतकºयांशी संवाद : पथकातील अन्य अधिकाºयांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केंद्र सरकारने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गठीत केले असून पथकातील केंद्रीय कृषि मंत्रालयांतर्गत येणाºया कापूस विकास संचालनालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्राची रविवार, २४ नोव्हेंबर रोजी पाहणी करून बाधीत शेतकºयांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक सुभाष नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, रिसोडचे तहसीलदार अजित शेलार, वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर यांची उपस्थिती होती.
सिंग यांच्या पथकाने रिसोड तालुक्यातील महागाव येथील माधव गायकवाड यांच्या नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली. गायकवाड यांनी यंदा ३ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. त्यापैकी बहुतांश सोयाबीनचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. जे काही सोयाबीन होणार आहे, त्यालाही जेमतेम दर मिळणार आहे. तुरीचेही पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे ते म्हणाले. महागाव शेतशिवारात सुमारे ६४२ हेक्टरवर सोयाबीन पेरण्यात आले होते, यापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बाळखेड येथील रमेश भारती यांच्या शेतातील पीक नुकसानाचीही सिंग यांच्या पथकाने पाहणी केली. भारती यांच्या नदीकाठी असलेल्या तीन हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन आणि तूर पिकाचे प्रचंड नुकसान झाले. पुरामुळे जमीन खरडून गेली असून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी किमान पाच वर्षे लागतील, ही बाब भारती यांनी सिंग यांच्या निदर्शनास आणून दिली. या भेटीत डॉ. आर.पी. सिंग यांच्या पथकाने जिल्ह्यातील इतरही नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेतले.
दरम्यान, जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यातील पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे करून तसे सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मोडक यांनी डॉ. सिंग यांना सांगितले.