वातावरणातील बदलाचा पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 04:04 PM2019-02-08T16:04:38+5:302019-02-08T16:04:44+5:30
आसेगाव पो.स्टे. (वाशिम) : वातावरणातील बदल आणि बुधवारी रात्रीच्या सुमारास रिमझिम पाऊस आल्याचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पो.स्टे. (वाशिम) : वातावरणातील बदल आणि बुधवारी रात्रीच्या सुमारास रिमझिम पाऊस आल्याचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला. नैसर्गिक संकटामुळे आसेगाव पो.स्टे. परिसरातील शेतकरी त्रस्त असून, शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकºयांनी ८ फेब्रुवारी रोजी केली.
रब्बी पिके अंतिम टप्प्यात आली असताना गत आठवड्यापासून वातावरणात अचानक बदल झाल्याने पिकांना फटका बसत आहे. अशातच बुधवार, ६ फेब्रुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आसेगाव परिसरात रिमझिम पाऊस पडला. यामुळे शेतकºयांची तारांबळ उडाली. जनावरांचा चारा, कुटार झाकण्यासाठी शेतकºयांना धडपड करावी लागली. ७ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने आंबा , गहू, हरभरा, हळद या रब्बी पिकांची मळणी धोक्यात सापडली आहे. भाजीपाल्यासह सर्वच बागायती पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांच्या समस्येत भर पडली. आंब्याचा मोहोर गळणे, डाळिंबावर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका हळद या पिकाला बसला आहे. नांदगाव येथे वातावरणातील बदलामुळे हळद पिकावर करपा रोग पडल्याने उत्पादनात घट येण्याची भीती वर्तविली जात आहे.