वाशिम : काेराेना संसर्गामुळे नगरपालिका क्षेत्रातील कार्यशैलीत पूर्णपणे बदल हाेऊन मूळ कामे बाजूला ठेवून काेराेना संसर्गाशी संबंधित कार्यावर भर देण्याचे काम जिल्ह्यातील नगरपालिकांना करावे लागत आहे. यामुळे इतर विकासक कामे रखडली असली तरी, हे ही तेवढे महत्त्वाचे म्हणावे लागेल.
जिल्ह्यात एकूण ४ नगरपालिका, २ नगरपंचायत आहेत. २०२० मध्ये काेराेना संसर्गामुळे लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर नगरपालिकांना काेराेना संसर्ग राेखण्यासाठी शहर निर्जंतुकीकरण, काेराेना बाबतची जनजागृती, दुकान, प्रतिष्ठान व्यावसायिकांनी नियमांचे पालन करण्यासंदर्भात लक्ष ठेवण्यासह विविध कार्यावर भर देण्यात आला. यामुळे शहरातील रस्ते, पाणी, पथदिवे आदी कामांकडे दुर्लक्ष करावे लागले. काेराेनाच्या संकटातून शहरवासीयांना दूर ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने विविध उपाययाेजना कराव्या लागल्यात. नगरपालिकेत अत्यावश्यक कामाशिवाय न येण्यासह ऑनलाईन कार्यावर भर देण्यात आला. रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांवर साेपविण्यात आले. नगरपालिकेतील प्रत्येक विभागाच्या मुख्य द्वारासमाेर दाेरी किंवा खुर्ची ठेवून नागरिकांची कामे करण्यात आली. प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचारी मास्क घालून काम करताना दिसून आलेत. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर , चाैकामध्ये ध्वनीक्षेपकाद्वारे काेराेनाबाबत जनजागृती कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आली.
...........................
कामाचा ताण वाढला
काेराेना बाधितांमध्ये वाढ झाल्याबराेबर नगरपालिकेत असलेल्या कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेतील कामांसह इतर कामे साेपविण्यात आल्याने कामाचा ताण वाढला आहे. तसेच कर्मचारीच स्वत: बाधित ठरत असल्याने कर्मचारी संख्या कमी झाल्याचा परिणाम जाणवला.
..................
कर वसुलीसह इतर कामे प्रभावित
नगरपरिषदेचे अनेक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना काेराेना संसर्ग उपाययाेजना, जनजागृतीचे कार्य करावे लागत असल्याने नगरपालिकेतील मूळ कार्य प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे. याचा कर विभागावर ही माेठा परिणाम झाला आहे. दरवर्षी हाेणारी कर वसुली व काेराेना काळातील कर वसुलीमध्ये माेठ्या प्रमाणात घट आहे. तसेच पाणीपुरवठा याेजनेची कामे थंड बस्त्यात असून या विभागातील ही कर्मचारी काेराेना संसर्ग संबंधित कार्यात गुंतले आहेत.
...................
दरवाज्यांना कुलूप ; खिडकीद्वारे कार्य
जिल्ह्यात दिवसेंदिवस काेराेना बाधितांमध्ये वाढ हाेत असल्याने खबरदारी म्हणून अति आवश्यक कामाशिवाय नगरपालिकेत न येण्याचे आवाहन प्रशासनाकडून लाॅकडाऊन काळात करण्यात आले हाेते. यावेळी नगरपालिकेतील मुख्यद्वाराला कुलूप लावून ठेवले हाेते. नागरिकांनी छाेट्या दरवाज्यातून येऊन खिडकीतून संपर्क साधण्याचे नियाेजन जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये करण्यात आले हाेते. आजच्या घडली प्रवेश सुरु असून काेराेना नियमांचे पालन आवश्यक केले आहे.