वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने आजपर्यंत एकूण ६३८ जणांना जीव गमवावा लागला. या संकट काळात १६४ बालकांचे प्रत्येकी एक; तर ४ बालकांचे दोन्ही पालक हिरावले गेले. यामुळे खेळण्या-बागडण्याच्या वयातच अनाथ झालेल्या बालकांच्या संगोपनासाठी ते सज्ञान होईपर्यंत शासनस्तरावरून प्रतिमहिना ११०० रुपये दिले जाणार आहेत. प्रत्यक्ष मदतीसाठी हे प्रस्ताव ‘ट्रेझरी’त दाखलदेखील करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेला एप्रिल २०२० पासून सुरुवात झाली. फेब्रुवारी २०२१ पर्यंत कायम राहिलेल्या या लाटेत एकूण ७४३० जण संसर्गाने बाधित झाले; तर १५६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर आलेली संसर्गाची दुसरी लाट मात्र अतितीव्र स्वरूपाची ठरली. चालू वर्षी मार्च ते सप्टेंबर या ७ महिन्यांच्या काळात ३४ हजार ३०५ जण बाधित ठरले, तसेच ४८२ जणांचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला. संसर्गाच्या दोन्ही लाटांमध्ये पालकत्व हरवलेल्या बालकांची एकूण संख्या १६८ इतकी आहे. त्यातील १६४ बालकांनी दोनपैकी एक पालक गमावला. संबंधितांना शासनस्तरावरून बालसंगोपनासाठी प्रतिमहिना ११०० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. उर्वरित ४ बालकांच्या दोन्ही पालकांचा कोरोनात मृत्यू झाला. त्यांना शासनस्तरावरून प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसाहाय्य केले जाणार असून, ही प्रक्रिया सध्या गतिमान झाली आहे.
...................
४१७३५
जिल्ह्यात कोरोनाने एकूण बाधित
६३८
कोरोनाने आतापर्यंत झालेले मृत्यू
१६४
एका पालकाचा मृत्यू झालेले बालक
४
दोन्ही पालकांचा मृत्यू झालेले बालक
.................
कोट :
जिल्ह्यात १६४ बालकांच्या प्रत्येकी एका पालकाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांना शासनस्तरावरून बालसंगोपन योजनेंतर्गत प्रतिमहिना ११०० रुपये अर्थसाहाय्य केले जाणार आहे. प्रत्यक्ष मदतीसाठी प्रस्ताव ‘ट्रेझरी’त पाठविण्यात आले आहेत. उर्वरित ४ बालकांच्या दोन्ही पालकांचा कोरोनाने मृत्यू झाला. संबंधितांना प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसाहाय्य केले जाणार आहे.
- प्रियंका गवळी, महिला व बालविकास अधिकारी, वाशिम