इंझोरी: शाळेचे शैक्षणिक सत्र संपले असून, सुट्यांचा काळ सुरू झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत सुट्याचा आनंद घेण्यासाठी चिमुकले आजोळी जातात; परंतु इंझोरीतील चिमुकली मुले याला यंदा अपवाद ठरली असून, सुट्याचा आनंद उपभोगण्याऐवजी ते रखरखत्या उन्हात श्रमदान करून गावातील तलावाच्या पुनरुज्जीवनाला हातभार लावत आहेत. गावातील ग्रामचेतना मंडळाच्या पुढाकारातून होत असलेल्या गावतलावाच्या पुनरुज्जीवनासाठी गावकरी झटत असतानाच आता या वडिलधाऱ्या मंडळीसोबत गावातील चिमुकली मुले, मुलीही यात सहभागी झाले आहेत. रखरखत्या उन्हात तलावाच्या पुनरुज्जीवनासाठीही मुले श्रमदान करीत आहेत. इंझोरीतील पाणीटंचाईवर कायम मात करण्यासाठी गावातील ग्रामचेतना मंडळाने गावालगतच्या गावतलावाचे पुनरुज्जीवन करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला गावकऱ्यासह गावातील शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचेही समर्थन मिळाले आणि सर्वांनी तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी श्रमदान केले. वडिलधारी मंडळी गावाच्या भल्यासाठी झटत असल्याचे पाहून गाातील चिमुकली मुलेही यासाठी सरसावली. सुट्याचा आनंद घेण्यासाठी आजोळी जाऊन तेथे दिवसभर बागडायचे, आजी, आजोबा, मामा, मामी, मावशी आणि त्यांच्या मुलांशी गप्पा मारायच्या आंब्याची चव चाखायची, असे विचार सुट्याच्या दिवसांत चिमुकल्यांच्या मनात घोळत असतात; परंतु इंझोरीतील या चिमुकल्यांनी. यंदा वेगळाच आदर्श निर्मा केला आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात ही चिमुकली रखरखत्या उन्हात तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी झालेल्या खोदकामातील माती ते टोपल्यांत भरून तलावाच्या कडेला टाकत आहेत. अवघ्या ७ ते १० वर्षे वयोगटातील या चिमुकल्यांचे प्रयत्न जलसंधारणाच्या कामासाठी श्रमदान करण्यास टाळाटाळ करणाºया लोकांसाठी आदर्श ठरावे असेच आहेत. गावातील दोन तीन नव्हे, तर चक्क १४ ते २० मुले येथे श्रमदान करतानाचे चित्र दरदिवशी पाहायला मिळते. हे काम आमचेही आहे ! इंझोरीतील गावतलावाचे खोलीकरण करताना गावकऱ्यांनी या तलावाचे नाव रामतलाव असे ठेवले आहे. या तलावाच्या खोलीकरणासाठी संपूर्ण गाव झपाटून गेले आहे. टोपले, फावडे, कुदाळ घेऊन जो, तो येथे श्रमदान करण्यासाठी येत आहे. एवढेच काय, तर गावातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही या तलावासाठी श्रमदान केले आहे. हे सर्व पाहूनच आम्हीही या श्रमदानात सहभाग घेतला असून, हे काम आमचेही आहे, असे ही चिमुकली मुले सर्वांना सांगत श्रमदान करीत आहेत.
रखरखत्या उन्हात चिमुकले लावत आहेत तलावाच्या पुनरुज्जीवनाला हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 4:57 PM
सुट्याचा आनंद उपभोगण्याऐवजी ते रखरखत्या उन्हात श्रमदान करून गावातील तलावाच्या पुनरुज्जीवनाला हातभार लावत आहेत.
ठळक मुद्देग्रामचेतना मंडळाने गावालगतच्या गावतलावाचे पुनरुज्जीवन करण्याची संकल्पना मांडली. शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचेही समर्थन मिळाले आणि सर्वांनी तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी श्रमदान केले. वडिलधारी मंडळी गावाच्या भल्यासाठी झटत असल्याचे पाहून गाातील चिमुकली मुलेही यासाठी सरसावली.