ग्राम संघातून स्त्री भ्रूण हत्येवर मंथन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 03:30 PM2020-02-18T15:30:19+5:302020-02-18T15:30:27+5:30
ग्राम संघाच्या सभेतून सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा घडविणे आणि स्त्री भ्रूण हत्या टाळणे, अनिष्ट प्रथांवर हल्लाबोल, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी विषयांवर मंथन केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राष्ट्रीय ग्राम जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्राम संघाची स्थापना करण्यात येत आहे. ग्राम संघाच्या सभेतून सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा घडविणे आणि स्त्री भ्रूण हत्या टाळणे, अनिष्ट प्रथांवर हल्लाबोल, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी विषयांवर मंथन केले जात आहे.
राष्ट्रीय ग्राम जीवनोन्नती अभियान अंतर्गत प्रत्येक गावामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्राम संघाच्या स्थापना करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले होते. या निर्देशानुसार जिल्ह्यातील ग्रामसंघाची स्थापना केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक ग्रामसंघांची स्थापना झाली आहे. महिला व बालकल्याण अंतर्गत सेवा, योजना व सामाजिक प्रश्नाबाबत चर्चा घडवून महिलांच्या माध्यमातून काही अनिष्ट बाबीवर प्रतिबंध घालण्याबाबत जनजागृती केली जात आहे. सोमवारी पार्डी टकमोर येथे ग्रामसंघाची सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषेदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहूर्ले, बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, विस्तार अधिकारी बाळकृष्ण अवगण यांनी स्त्रीभ्रूण हत्या टाळणे, शिक्षण, आरोग्य ,महिला बचत गट तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत मुलीचे प्रमाणात होत असलेली घट इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला. यावेळी बचत गटाचे समन्वयक, अंगणवाडी सेविका व ग्रामसंघातील महिलांची उपस्थिती होती. संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. (प्रतिनिधी)