शहरामध्ये ८ वाहनांद्वारे घातली जाते गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:44 AM2021-01-16T04:44:36+5:302021-01-16T04:44:36+5:30
जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिम शहराचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला. जुने शहरात जुन्या पद्धतीच्या इमारतींची जागा टोलेजंग ...
जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिम शहराचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला. जुने शहरात जुन्या पद्धतीच्या इमारतींची जागा टोलेजंग इमारतींनी घेतली आहे. यासोबतच नव्याने आययूडीपी कॉलनी, सिव्हिल लाइन, लाखाळा, तिरुपती सिटी यासह विविध स्वरूपांतील वसाहती विकसित झाल्या असून, मोठमोठ्या घरांची संख्या वाढली आहे. या वसाहतींमधील रहिवासी सुरक्षित राहावे, रात्रीच्या सुमारास होणाऱ्या चोऱ्या व घरफोड्यांवर नियंत्रण मिळून चोरट्यांवर वचक निर्माण व्हावा, यासाठी पोलीस प्रशासनाने गस्तीकडे विशेष लक्ष पुरविले आहे. या अंतर्गत ३२ कर्मचारी रात्रीच्या सुमारास ‘ऑन ड्युटी’ कर्तव्य बजावत असल्याचे दिसत आहे.
...................
शहरात गेल्या वर्षभरात ५० चोऱ्या, २५ घरफोड्या
एकट्या वाशिम शहरात २०२० या वर्षांत एकूण ५० चोऱ्या आणि २५ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. पोलीस प्रशासनाने वचक निर्माण केल्याने, या स्वरूपातील गुन्हेगारीचे हे प्रमाण तुलनेने कमी आहे. विशेष म्हणजे ५० चोऱ्यांपैकी ३८ चोऱ्यांचा; तर १८ घरफोडींचा तपास पूर्ण करून गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे.
................
संवेदनशील भागात पोलिसांची दैनंदिन गस्त
वाशिम शहरात ८ वाहनांद्वारे ३२ पोलीस कर्मचारी वाशिम शहरातील सर्वच वसाहतींमध्ये रात्रीच्या सुमारास गस्त घालतात. त्यात विशेषत: संवेदनशील भागावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. वाशिम-अकोला मार्गावरील तिरुपती सिटी या वसाहतीमध्येही पोलिसांची रात्रीच्या सुमारास गस्त राहत असल्याची माहिती तेथे कार्यरत सुरक्षारक्षक राजू ठाकूर यांनी दिली.
.........................
८ शहरात गस्तीवरील वाहने
४
दुचाकी
६
चारचाकी
३२
कर्मचारी
........................
कंट्रोल रूमचे वाहनांवर नियंत्रण
गस्तीवर असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर सद्यातरी जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. मात्र, गस्तीवरील प्रत्येक कर्मचाऱ्याकडे वॉकीटॉकी सोपविण्यात आलेली असून, प्रत्येक एका तासाने कंट्रोल रूमकडून त्यांच्याशी संपर्क साधला जातो. या माध्यमातून त्या-त्या बीटमधील इत्यंभूत माहिती कंट्रोल रूमपर्यंत पोहोचते.
.....................
वाशिम शहरात ६ चारचाकी वाहनांवर २४ व ४ दुचाकी वाहनांवर ४ कर्मचारी दररोज रात्री गस्त घालण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर कंट्रोल रूममधून नियंत्रण ठेवले जाते. लवकरच या वाहनांवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम