आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या मानधनाचा मार्ग मोकळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:33+5:302021-07-19T04:25:33+5:30
वाशिम : वाशिमसह राज्यातील ३५ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि चार विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक अशा एकूण ३९ जणांच्या ...
वाशिम : वाशिमसह राज्यातील ३५ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि चार विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक अशा एकूण ३९ जणांच्या दोन महिन्यांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झाला असून, महसूल विभागाने १४ जुलै रोजी २३.४० लाखांचा निधी विभागीय आयुक्तांकडे वळता केला.
महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी निर्माण केलेल्या आणि कंत्राटी तत्त्वावर ३६ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि सहा विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक अशी एकूण ४२ पदे मंजूर आहेत. यापैकी विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक पुणे, नाशिक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुंबई अशी तीन पदे रिक्त आहेत. उर्वरित ३९ पदांवर संबंधित अधिकारी कार्यरत असून, दोन महिन्यांच्या मानधनाचा प्रश्न रखडला होता. अखेर महसूल विभागाने १४ जुलै रोजी दोन महिन्यांच्या मानधनासाठी २३ लाख ४० हजारांच्या निधीला मंजुरी दिली असून, विभागीय आयुक्तांकडे वळता करण्यात आला. विभागीय आयुक्तांकडून संबंधित जिल्ह्यास ‘बीडीएस’ प्रणालीवर निधी वितरित केला जाणार आहे.