वाशिम : अपूर्ण घरकुलांचे काम पूर्ण करणे, घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी महाआवास योजना राबविण्यात येत असून, आदर्श आचारसंहितेमुळे निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती करण्यावर मर्यादा आल्या आहेत.प्रत्येकाला हक्काचे घर मिळण्यासाठी शासनाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, आदीम आवास, अटल बांधकाम कामगार आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना, ग्रामीण भागातील शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठीची योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत अपूर्ण घरकुलांचे काम पूर्ण करणे, घरकुलासाठी लाभार्थीकडे जागा उपलब्ध नसल्यास सरकारी जागा उपलब्ध करून देणे, अतिक्रमण असल्यास नियमानुकूल करणे, जागा खरेदीसाठी अनुदानाव्यतिरिक्त बँकांकडून ७० हजार रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे आदी उद्देशातून २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात महाआवास अभियान राबविले जात आहे. घरकुलासाठी १.२० लाखाचे अनुदान, नरेगाअंतर्गत ९० दिवसाचा रोजगार, शौचालय बांधकामासाठी १२ हजाराचे अनुदान आणि घरकुल पूर्ण झाल्यानंतर नळ, विद्युत व गॅस जोडणी देण्यात येणार आहे. या अभियानाची व्यापक जनजागृती व्हावी याकरीता जिल्हास्तरावर कार्यशाळा पार पडल्यानंतर १२ डिसेंबरपर्यंत तालुकास्तरावर आॅनलाईन पद्धतीने कार्यशाळा घेण्यात आली. १३ डिसेंबरपासून गावस्तरावर जनजागृती होणे अपेक्षीत होते. ग्राम पंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने जनजागृतीवर मर्यादा आल्या. जिल्ह्यातील १६३ ग्राम पंचायतींची निवडणूक होत असून, निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींचा अपवाद वगळता उर्वरीत ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती करण्यावर बंधने नाहीत, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने स्पष्ट केले.
‘महाआवास योजने’च्या जनजागृतीला आचारसंहितेचा फटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 6:41 PM