बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी मोहीम राबवा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By संतोष वानखडे | Published: September 21, 2022 06:03 PM2022-09-21T18:03:58+5:302022-09-21T18:05:42+5:30
वाशिम - जिल्ह्यात ज्या तालुक्यामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे, त्या तालुक्यांकडे विशेष लक्ष देण्यात यावे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या ...
वाशिम - जिल्ह्यात ज्या तालुक्यामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे, त्या तालुक्यांकडे विशेष लक्ष देण्यात यावे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी मोहिम राबवावी. बोगस डॉक्टर आढळल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २१ सप्टेंबर रोजी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कृती समितीच्या सभेत आरोग्य यंत्रणेला दिले.
सभेला समितीच्या सदस्य तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी मिन्नू. पी. एम., उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) मिनाक्षी भस्मे, जिल्हा औषधी निर्माण असोशिएशनचे अध्यक्ष राजेश सिरसाठ, डॉ. अलका मकासरे व स्वयंसेवी संस्थेच्या सोनाली ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी शन्मुगराजन म्हणाले, जिल्हयातील नागरीकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी मोहीम राबवावी. बोगस डॉक्टर आढळल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. गावात किंवा शहरात दवाखाना सुरू करणाऱ्या डॉक्टरांना ना हरकत प्रमाणपत्र देताना त्यांच्या वैद्यकीय पदविका, पदवी तसेच नोंदणीच्या कागदपत्रांची तपासणी संबंधीत ग्रामपंचायत व नगरपलिकेने करावी. जिल्हयातील सर्व ६३ सोनोग्राफी केंद्राची नियमित तपासणी करण्यात यावी. डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्श्नशिवाय मेडिकल स्टोअर्समधून एच. आणि एच-1 प्रकारची औषधे रुग्णांना देवू नये, याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष लक्ष द्यावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.