दिलासा : कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील डॉक्टरसह सात जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 04:12 PM2020-05-13T16:12:18+5:302020-05-13T16:12:18+5:30
त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ते सर्व 'निगेटिव्ह' असल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सावंगी (जि.वर्धा) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कवठळ (ता.मंगरूळपीर) येथील एका व्यक्तीच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल १० मे रोजी ‘पॉझिटिव्ह’ आला. या रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कात आलेल्या कारंजा येथील एका खासगी डॉक्टरसह पाच तसेच पाचंबा व पोहा येथील 'सारी'चे प्रत्येकी एक रुग्ण असे एकूण ७ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने ११ मे रोजी तपासणीसाठी अकोला येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ते सर्व 'निगेटिव्ह' असल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला. दुसरीकडे अजून ९ अहवाल प्रतिक्षेत असून, थोडीशी धाकधुकही कायम आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील एका मधुमेही रूग्णाला अस्वस्थ वाटल्याने त्याला कारंजा येथील एका खासगी दवाखान्यात चार दिवस भरती केले होते. रुग्ण कारंजा येथून अकोला आणि अकोला येथून वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात ८ मे रोजी उपचारार्थ दाखल झाला. १० मे रोजी त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने, त्याच्यावर उपचार करणाºया कारंजा येथील त्या खासगी डॉक्टरसह पाच जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी ११ मे रोजी अकोला पाठविण्यात आले. याबरोबरच पाचंबा व पोहा येथील 'सारी'चे प्रत्येकी एक रुग्ण असे दोन नमुनेही तपासणीसाठी पाठविले होते. या ११ नमुन्यांचे अहवाल १३ मे रोजी दुपारी प्राप्त झालेअसून, सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला. दुसरीकडे १२ मे रोजी अजून ९ जणांच्या थ्रोट स्वॅबचे नमुने अकोला येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्याचे अहवाल अप्राप्त असल्याने थोडी धाकधुकही कायम आहे.
कवठळ येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या ‘लो-रिस्क’ संपर्कात एकूण ३२ जण आलेहोते. या सर्वांची प्राथमिक स्तरावर आरोग्य तपासणी केली असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. आरोग्य विभागाची चमू गावात ठाण मांडून असून, १२ चमूंतर्फे घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. जवळपास १४०० नागरिकांचे सर्वेक्षण केले असून, कुणालाही कोणतीही लक्षणे नसून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. खबरदारीचा उपाय म्हणून अजून ११ दिवस कवठळ येथे आरोग्य विभागाचा विशेष वॉच राहणार आहे.