लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा 'स्फोट' होत असून, सक्रिय रुग्णांची संख्या ११ टक्क्यांवर पोहचली आहे. २०८८ सक्रिय रुग्ण असून, खबरदारीचा उपाय म्हणून खासगी कोविड रुग्णालयांची संख्या वाढविण्यात आली आहे.देशात साधारणतः मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्येत वाढ होत सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. सप्टेंबर महिन्यात २६०० रुग्णांची भर पडली होती. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख कमी होत गेला. जानेवारी महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आले. कोरोनाचा प्रवास परतीच्या मार्गावर असतानाच, फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक झपाट्याने वाढ झाली. यामुळे यापूर्वी बंद केलेली सरकारी कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्यात आले. कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. दैनंदिन हजारावर चाचण्या होत असून सरासरी २४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची टक्केवारी वाढली आहे. यापूर्वी सक्रिय कोरोना रुग्णांची टक्केवारी ६ होती. हा आकडा आता ११ टक्क्यावर पोहचला आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ११ टक्के अर्थात दोन हजारावर रुग्ण सक्रिय असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग अॅक्शन मोडवर काम करीत आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. रुग्ण खाटा कमी पडू नये म्हणून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीदेखील आता अधिक जबाबदारीने काळजी घ्यावी. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग व हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे.- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.