लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी सातजणांचा मृत्यू, तर ५९७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ७ मे रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३१,११४ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. वाशिम शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासीयांनी आता तरी सतर्क होणे आवश्यक ठरत आहे. मात्र, नागरिक फारशी काळजी घेत नसल्याने वाशिम तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याचे शुक्रवारीदेखील समोर आले. शुक्रवारी वाशिम तालुक्यात सर्वाधिक २१७ रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात मृत्यूसत्रही सुरूच असल्याचे दिसून येते. शुक्रवारी आणखी सातजणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. ५९७ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम २१७, मालेगाव तालुक्यातील ११०, रिसोड तालुक्यातील १११, मंगरूळपीर तालुक्यातील ४५, कारंजा तालुक्यातील ३१ आणि मानोरा तालुक्यात ४० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ४३ बाधितांची नोंद झाली असून ३३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाचा धोका अजून टळलेला नसल्याने नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले.(प्रतिनिधी)
Corona Cases in Washim : आणखी सात जणांचा मृत्यू; ५९७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 10:25 AM