खासगी रुग्णालयांतील रुग्ण, नातेवाईकांचीही होणार कोरोना चाचणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:43 AM2021-05-07T04:43:09+5:302021-05-07T04:43:09+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर वेळीच उपचार व्हावे म्हणून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणीदेखील नागरिकांची कोरोना चाचणी केली जात ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर वेळीच उपचार व्हावे म्हणून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणीदेखील नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकला व अन्य आजार बळावत असल्याने खासगी कोविड केअर, कोविड हॉस्पिटलव्यतिरिक्त अन्य खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांसह नातेवाईकांची गर्दी होत आहे. यामुळे कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता यापुढे खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आदींची आरटी-पीसीआर चाचणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सर्व खासगी डॉक्टरांना दिल्या आहेत. उपचारासाठी आलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे दिसल्यास त्यांना प्रथम आरटी-पीसीआर चाचणी करण्यास सांगावी, असेही जिल्हाधिकायांनी सूचनापत्रात नमूद केले. तसेच खासगी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत असलेल्या नातेवाईकांची गर्दी होत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचीदेखील आरटी-पीसीआर चाचणी करावी, अशा सूचनाही शण्मुगराजन एस. यांनी दिल्या.