वाशिम : कोरोनाबाधितांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, वाशिम येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (आरटी-पीसीआर लॅब) ७ फेब्रुवारी ते ६ मार्च या २८ दिवसांच्या कालवधीत २० हजार ११५ स्त्राव नमुन्यांची तपासणी केली.जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बाधितांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या सुद्धा वाढविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात संकलित केलेले स्त्राव नमुन्यांची लवकरात लवकर तपासणी करण्यासाठी वाशिम येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील (आरटीपीसीआर लॅब) अधिकारी, कर्मचारी मेहनत घेत आहेत. दोन शिफ्टमध्ये प्रयोगशाळेचे कामकाज सुरु असून ७ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत २० हजार ११५ स्त्राव नमुने प्रयोगशाळेत तपासले गेले. १० आॅक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वाशिम येथील आरटी-पीसीआर प्रयोगशाळेचे आॅनलाईन स्वरुपात औपचारिक उद्घाटन झाले. सुरुवातीचे काही दिवस प्रयोगशाळेत दिवसाला ३०० नमुन्यांची तपासणी होत होती. त्यानंतर ही क्षमता टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात आली असून आता दिवसला सरासरी १२०० नमुन्यांची तपासणी केली जात आहे. प्रयोगशाळेमध्ये प्राप्त होणारे नमुने वेळेत तपासून त्याचे अहवाल तातडीने देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्या मार्गदर्शनात व आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी डॉ. किशोर लोणकर व डॉ. बालाजी हरण यांच्या नेतृत्वात कोरोना योद्ध्यांची टीम सज्ज असून दोन शिफ्टमध्ये प्रयोगशाळेचे कामकाज सुरु आहे. प्रयोगशाळेत आतापर्यंत एकूण ६७ हजार ४५७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. गेल्या २८ दिवसाच्या कालावधीतील आरटी-पीसीआर चाचण्यांचा विचार करता अमरावती विभागात वाशिम जिल्हा क्रमांक दोनवर आहे. ७ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान पहिल्या सप्ताहात १५३१ नमुने तपासले गेले, टप्प्या-टप्प्याने यामध्ये वाढ होवून २८ फेब्रुवारी ते ६ मार्च या सप्ताहात ८ हजार ७४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
CoronaVirus : २८ दिवसांत २० हजार नमुन्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 5:27 PM