Coronavirus : संरक्षक किटचा तुटवडा; खासगी डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 10:27 AM2020-05-13T10:27:15+5:302020-05-13T10:27:34+5:30
खासगी डॉक्टरांप्रमाणेच आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात संरक्षक किट उपलब्ध नसल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाविरोधात लढणाऱ्या खासगी डॉक्टरांप्रमाणेच आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात संरक्षक किट उपलब्ध नसल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात यापूर्वी कारंजा येथील दोन खासगी डॉक्टर आल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून संरक्षक किट पुरविण्याची मागणी समोर आली. दरम्यान, कवठळ येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कारंजा येथील एका खासगी डॉक्टरच्या थ्रोट स्वॅब नमुन्याचा अहवाल नेमका कसा येतो, याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
कोरोनाविरूद्धच्या लढ्यात खºया अर्थाने सरकारी डॉक्टर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक याप्रमाणेच खासगी डॉक्टर उतरले असून, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, हे आरोग्यरक्षक रुग्णांची सेवा करीत आहेत. या आरोग्य रक्षकांना पुरेशा प्रमाणात ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’ (पीपीई-संरक्षक कीट) उपलब्ध नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसचा अपवाद वगळता ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांना पुरेशा प्रमाणात ‘पीपीई’ किट उपलब्ध नाही. ग्रामीण भागातही काही वैद्यकीय अधिकाºयांचा अपवाद वगळता अन्य कर्मचाºयांसाठी पीपीई किटचा तुटवडा आहे. खासगी डॉक्टरांना तर जिल्हा प्रशासनाने ‘पीपीई’ किट उपलब्ध करून दिली नाही. खासगी डॉक्टरांनी स्वत: आपल्या सोयीनुसार तर आयएमए संघटनेने स्व:खर्चातून पीपीई किट उपलब्ध केली. परंतू, अद्यापही काही खासगी डॉक्टरांना सदर किट उपलब्ध नाही. कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात खासगी डॉक्टर येत असल्याने ग्रामीण ते शहरी अशा सर्वच डॉक्टरांसाठी ‘पीपीई’ किट उपलब्ध करावी, असा सूर डॉक्टरांमधून उमटत आहे.
सरकारी डॉक्टरांकडे पीपीई किट उपलब्ध आहेत. अनेक खासगी डॉक्टरांनीदेखील स्वत:हून पीपीई किट उपलब्ध करून घेतली आहे. इंडीयन मेडीकल असोसिएशनने (आयएमए)देखील काही पीपीई किट उपलब्ध करून दिली. जिल्ह्यातील काही शहरातील खासगी डॉक्टरांकडे ही किट उपलब्ध नाही. खासगी डॉक्टरांनी आवश्यक ती खबरदारी घेऊनच रूग्णांची तपासणी करावी. रूग्णांनीदेखील स्वत:हून काळजी घ्यावी.
- डॉ. अनिल कावरखे
जिल्हाध्यक्ष, आयएमए, वाशिम
सर्वच डॉक्टर व कर्मचाºयांना पीपीई किटची आवश्यकता नसते. आवश्यक त्या सरकारी डॉक्टरांना व आरोग्य कर्मचाºयांना पीपीई किट उपलब्ध करून दिली आहे. आवश्यक ती खबरदारी घेऊनच रुग्णांची तपासणी करावी, अशा सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. खासगी डॉक्टरांसाठी पीपीई किट उपलब्ध करण्याचा प्रयत्न राहिल.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम