लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सावंगी (जि.वर्धा) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कवठळ (ता.मंगरूळपीर) येथील एका व्यक्तीच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल १० मे रोजी ‘पॉझिटिव्ह’ आला. या रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कात आलेल्या कारंजा येथील एका खासगी डॉक्टरसह १६ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने ११ व १२ मे रोजी तपासणीसाठी पाठविले असून, याचा अहवाल नेमका काय येतो, याकडे लक्ष लागून आहे.जिल्ह्यात १२ मे पर्यंत तपासणीसाठी ९७ नमुने पाठविले होते. त्यापैकी तीन पॉझिटिव्ह (डिस्चार्ज १, मृत्यू १, उपचार सुरू १) तर ७८ अहवाल निगेटिव्ह आले होते. पॉझिटिव्ह असलेला मेडशी येथील रुग्ण बरा झाल्याने त्याला २४ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर ३ मे रोजी नागपूरवरून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रक क्लिनरला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले. या क्लिनरचा काही तासातच मृत्यू झाला. दरम्यान या क्लिनरच्या संपर्कातील ट्रक चालकालादेखील कोरोना विषाणू संसर्ग झाल्याने सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील एका मधुमेही रूग्णाला अस्वस्थ वाटल्याने त्याला कारंजा येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले होते. येथे हा कोरोनाबाधित रुग्ण चार दिवस भरती होता. कारंजा येथून अकोला आणि अकोला येथून वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात सदर रुग्ण ८ मे रोजी उपचारार्थ दाखल झाला. १० मे रोजी त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने, त्याच्यावर उपचार करणाºया कारंजा येथील त्या खासगी डॉक्टरसह एकूण सात जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी ११ मे रोजी अकोला पाठविण्यात आले. दुसºया दिवशी १२ मे रोजी ९ जणांचे नमुने पाठविण्यात आले आहेत. या नमुन्याचा नेमका काय येणार याकडे आरोग्य विभागासह जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.दरम्यान, कवठळ येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या ‘लो-रिस्क’ संपर्कात एकूण ३२ जण आले असून, या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात आहे. आरोग्य विभागाची चमू गावात ठाण मांडून असून, घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. १४ दिवस गावात सर्वेक्षण केले जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितले. गावात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
११ मे रोजी ७ आणि १२ मे रोजी ९ असे एकूण १६ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल १३ मे रोजी येण्याची शक्यता आहे. कवठळ येथे आरोग्य विभागातर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्या गावातून बाहेर जाण्यास व बाहेरच्या व्यक्तीला गावात जाण्यास तुर्तास मनाई करण्यात आली आहे.
- डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम