मालेगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मालेगाव नगर पंचायतच्यावतीने एप्रिल महिन्यात जवळपास ६५०० कुटुंबात डोअर टू डोअर सर्वेक्षण मोहीम राबविली. यामध्ये २५ हजार ९२७ नागरिकांची नोंदणी झाली असून, सर्दी, ताप, खोकला अशी प्राथमिक लक्षणे तसेच दमा, रक्तदान, मधुमेह असे आजार आढळून आलेल्या नागरिकांची दुसºयांदा तपासणी केली असून, या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांनी सांगितले.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर खबरदारी म्हणून मालेगाव नगर पंचायतने कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीच्या चमूद्वारे शहरात सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये शहरात सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनास त्रास असणारे रुग्ण शोधून काढण्याचे उदिष्ट देण्यात आले होते. यात ० ते ५ वर्षे वयोगटातील २०८४, ५ ते १८ वर्षे वयोगटातील ६३८०, १९ ते ४० वर्षे वयोगटातील १०७७८, ४० वर्षापेक्षा जास्त ६६८५ अशा नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यात रक्तदाब आजाराचे ८७४, दमा आजाराचे २४२, मधूमेह आजाराचे १०३७ आणि प्राथमिक लक्षणे असलेल्या व्यक्तींची संख्या (ताप,सर्दी, खोकला) ४४ असे रुग्ण आढळून आले होते. विशेष म्हणजे ताप, सर्दी खोकल्याची लक्षणे आढळलेल्या ४१ जणांना प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत उपचार करण्यात आले. दुसºया टप्प्यात आता हेही लक्षणे दिसून आले नाहीत. शिवाय सर्वेक्षणात ३७३५ जणांना वरील लक्षणे नसल्याचे आढळून आले. सर्वेक्षणाच्या या मोहिमेत आरोग्य सेविका १३, नगर परिषद कर्मचारी १३ अशा २६ जणांनी कर्तव्य बजावले.
नगर पंचायत मालेगाव अंतर्गत आरोग्य विभाग मिळून हा आरोग्य सर्वे पूर्ण झाला असून अजूनही अनेक लोक बाहेरून येत आहेत. जर त्यांना आरोग्यासाठी काही समस्या असल्यास त्यांनी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा किंबा नगर पंचायतशी संपर्क करावा. - डॉ. विकास खंडारे, मुख्याधिकारी, नगर पंचायत मालेगाव