लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील मेडशी येथील एका व़्यक्तीला कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर संपूर्ण मेडशी गाव सील करण्यात आले. त्यानंतर बाथिताच्या ‘हाय रिस्क’ संपर्कातील १२ व्यक्तींचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने तपासण्यासह गावातील ५३२० लोकांची तपासणी आरोग्य विभागाने केली. त्यापैकी ६१ लोकांना घरी विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला असून, आरोग्य विभागाची १४ पथके सकाळ, सायंकाळी फेरी मारून या गावातील लोकांच्या आरोग्याची चौकशी आहे.वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील एक व्यक्ती दिल्ली येथील संमेलनात सहभागी झाल्याच्या संशयावरून त्याला आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले, तर तातडीने त्याच्या ‘हाय रिस्क’ संपर्कातील १२ लोकांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले, या १२ रुग्णांसह त्याच्या ‘लो-रिस्क’ संपर्कातील ११ व्यक्तींनाही जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या सर्व प्रक्रियेनंतरही बाधित रुग्ण ज्या परिसरात राहत होता. त्या परिसरातील रुग्णांची चौकशी आणि तपासणीही आरोग्य विभागाने तातडीने केली, तर पुढील खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने मेडशी गाव ‘सील’ करून आरोग्य विभागाला या गावात तपासणी मोहिम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार गत आठ दिवसांपासून आरोग्य विभागाने मेडशी गावातील प्रत्येक भाग पिंजून काढताना युद्धपातळीवर १०६० घरातील ५३२० लोकांची तपासणी केली. त्यात बाधित रुग्णाच्या ‘लो-रिस्क’ संपर्कातील ६१ लोकांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्लाही आरोग्य विभागाने दिला. त्याशिवाय प्रत्येकी दोन व्यक्तीचा समावेश असलेली आरोग्य विभागाची १४ पथके मेडशी गावात सकाळ, सायंकाळ फिरून नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेत आहेत. या माहितीदरम्यान कोणालाही ताप, सर्दी, खोकला, आदिंचा त्रास असेल, तर तातडीने जिल्हा सामान्य रुग्णायालत पाठविण्याच्या सुचनाही या पथकांना देण्यात आल्या आहेत. तथापि, गेल्या आठ दिवसांत असा एकही रुग्ण येथे आढळून आलेला नाही.
हाय रिस्क संपर्कात केवळ १२ व्यक्तीचमेडशी येथील व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे त्याच्या थ्रोट स्वॅब अहवालावरून स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या हाय रिस्क संपर्कातील लोकांची माहिती तातडीने आरोग्य विभागाने घेतली. त्यात केवळ १२ व्यक्तींचाच समावेश होता. त्या सर्वांचे थ्रोट स्वॅब अहवाल निगेटिव्हही आले, तर लो-रिस्क संपर्कातील एकाही व्यक्तीत कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आली नाहीत.
मेडशीसह परिसरात शुकशुकाटमेडशी येथील एकास कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या गावाला सील केले असून, आरोग्य विभागाकडून प्रत्येक ग्रामस्थाची तपासणी करण्यात आली. या प्रकारामुळे गावातील जिवनावश्ये सेवा वगळता वाहतूक, तसेच इतर सेवाही ठप्प असल्याने मेडशीसह परिसरातील गावांतही सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. रस्ते निर्मनुष्य असल्याचे चित्र गुरुवारीही पाहायला मिळाले.