CoronaVirus in Washim : कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 12:43 PM2020-05-19T12:43:18+5:302020-05-19T12:44:42+5:30
पाच नमुन्यांचा अहवाल १९ मे रोजी पॉझिटिव्ह आला असून, एका अहवालाची प्रतीक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मालेगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कातील सहा जणांचे थ्रोट स्वॅब नमुने १६ मे रोजी तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते. यापैकी पाच नमुन्यांचा अहवाल १९ मे रोजी पॉझिटिव्ह आला असून, एका अहवालाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. त्यानंतर उत्तरप्रदेशमधील कोरोनाबाधीत ट्रकच्या क्लिनरचा वाशिममध्ये मृत्यू झाला. त्याच ट्रकचा चालक कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाला होता. मेडशी येथील एक रुग्ण व ट्रक चालकाने कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आले. दरम्यान, १५ मे रोजी मालेगाव येथील एक महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई येथे कामानिमित्त सदर महिलेचे कुटुंब गेले होते. या महिलेला मुंबई येथेच कोरोना विषणू संसर्ग झाल्याची लक्षणे आढळून आल्याने मुंंबई येथे थ्रोट स्वॅब नमुना घेतला होता. याचा अहवाल येण्यापूर्वीच सदर महिला ही कुटुंबातील अन्य सहा सदस्यांसोबत मालेगावकडे निघाली. वाशिम जिल्ह्याची सीमा लागण्यापूर्वीच या महिलेचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या वाहनातील सर्व सातही जणांना थेट जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात आणण्यात आले. त्यामुळे कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या संपर्कात मालेगाव येथील कुणीही आले नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी सांगितले. त्या महिलेच्या सोबत असणारे ‘हाय-रिस्क’ संपर्कातील सहा जणांचे थ्रोट स्वॅब नमुने १६ मे रोजी सकाळी तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते. १९ मे रोजी यापैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, अजून एका अहवालाची प्रतिक्षा आहे. एका जणाचा अहवाल नेमका काय येतो, याकडे लक्ष लागून आहे.
आता कोरोनाबाधित सहा रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी सांगितले.