मालेगाव: गतवर्षीच्या अवर्षणामुळे मालेगाव शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. पाण्याअभावी शहरवासियांचे अतोनात हाल सुरू असताना नगरसेवक किशोर महाकाळ यांनी नागरिकांची स्वखर्चाने तहान भागविण्यासाठी पुढाकार घेत मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे.
मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणाºया कुरळा धरणात ठणठणाट असल्याने महिनाभरापूर्वीच शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच नगर पंचायतच्या प्रस्तावित तातडीच्या पाणी पुरवठा योजनेला आणखी महिनाभराचा कालावधी असल्याने शहरवासियांना विकत पाणी घेऊन गरजा भागव्यावा लागत आहेत. नागरिकांची पाण्याअभावी होत असलेली परवड लक्षात घेत नगर पंचायतमधील प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक किशोर महाकाळ यांनी या समस्येवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी त्यांनी स्वत:च्या शेतातून स्वखर्चाने प्रभागापर्यंत दीड किलोमीटर अंतराची पाईपलाईन टाकली आणि त्याद्वारे प्रभागातील नागरिकांना मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे. विशेष म्हणजे मालेगाव शहरात दरवर्षी पाण्याची भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने त्यांनी मागील दोन वर्षेही हा उपक्रम प्रभागातील नागरिकांसाठी राबविला होता. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेकडो नागरिक त्यांच्या या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.
शहरातील नागरिकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत. त्यांची समस्या लखात घेत आपण स्वखर्चाने शेतातून पाईपलाईन टाकून मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे. दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, दोन दिवस आड प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी १२० लीटर पाणी या उपक्रमातून पुरविले जाते. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
-किशोर महाकाळ, नगर सेवक प्रभाग क्र १२, नगर पंचायत मालेगाव