बँकांसमोर गर्दी; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 04:56 PM2020-05-19T16:56:22+5:302020-05-19T16:56:29+5:30
बँकांसमोर नागरिकांची गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगही पाळले जात नसल्याचे १९ मे रोजी दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी बँकांसमोर गर्दी करू नये असे आवाहन तालुका व जिल्हा प्रशासनातर्फे केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र येथील बँकांसमोर नागरिकांची गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगही पाळले जात नसल्याचे १९ मे रोजी दिसून आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले. ग्राहकांची सोय व्हावी आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरता जिल्ह्यात बँकेची वेळ सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत करण्यात आली. संचारबंदी आदेश लागू असल्याने जमाव करण्यास मनाई आहे. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून बँकांनी व्यवहार ठेवावे, नागरिकांनी बँकेत किंवा बँकेसमोर गर्दी करू नये, अशा सूचना तालुका तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. काही दिवस फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत गर्दी टाळली होती. परंतू, आता पुन्हा बँकेत तसेच बँंकांसमोर गर्दी होत असल्योच दिसून येते. येथील जुन्या बस स्थानकावर असलेल्या सेंट्रल बँक समोर मंगळवारी सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे तिथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसले. सर्व सुरळीत सुरु असताना लोकांनी बँक समोर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिस प्रशासनाच्या आणि नगर पंचायतीच्या कारवाया सुद्धा थंडावल्याने आणि बँक प्रशासनानेही फिजिकल डिस्टन्सिंगकरीता योग्य ती खबरदारी न घेतल्याने बँकांसमोर गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. मंगळवार, १९ मे रोजी सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकांनी बारा वाजता लंच टाईम सांगून बारा ते साडेबारा बँक बंद केली होती. व्यवहार बंद झाल्याने बँकेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याने तिथे वाहतूक सुद्धा जाम झाली होती.