बाजारपेठेत नागरिकांची गर्दी; कोरोना संसर्ग वाढण्याची भीती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:18 AM2021-03-04T05:18:35+5:302021-03-04T05:18:35+5:30
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले आहेत. त्यानुसार वाशिम ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले आहेत. त्यानुसार वाशिम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जमावबंदीचा सुधारित आदेश जारी केला. ८ मार्चपर्यंत जमावबंदीच्या आदेशाला मुदतवाढ देण्यात आली. आठवड्याअखेर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत संचारबंदी असून, यादरम्यान जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश आहेत. यानुसार २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवसभर जिल्ह्यातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. सोमवार, १ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून बाजारपेठा पूर्ववत होताच विविध वस्तू, साहित्य खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठांत गर्दी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. बुधवारीदेखील वाशिम येथील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. दुकानात एकावेळी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये तसेच तपासणी यंत्र व सॅनिटायझरची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. मात्र, अनेक दुकानांमध्ये याचे पालन होत नसल्याचे दिसून येते. वाशिम शहरातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने बाजारपेठांत गर्दी होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेणे आवश्यक ठरत आहे.