वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत जिल्ह्याचा ‘ग्रीन झोन’मध्ये समावेश झाल्याने ५ मे रोजी बहुतांश दुकाने, प्रतिष्ठाने पूर्ववत झाली आहेत. परंतू, दुकानांमध्ये तसेच दुकानांसमोर ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असल्याने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडत असल्याचे १५ मे रोजी दिसून आले. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाने हाहा:कार माजविला आहे. वाशिम जिल्ह्याच्या नजिक असलेल्या अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. वाशिम जिल्ह्याचा समावेश ‘ग्रीन झोन’मध्ये असल्याने लॉकडाउन व संचारबंदीतून दुकाने, प्रतिष्ठानांना बºयापैकी सुट मिळालेली आहे. केश कर्तनालय, ब्युटीपार्लर, चहा व पानटपº्या, उपहारगृह, ढाबे, सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, बार आदी बंद ठेवून जनरल स्टोअर्स, स्टेशनरी, कापड दुकान यासह अन्य दुकाने सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्यास काही अटी व शर्तीच्या अधीन राहून सुट देण्यात आलेली आहे. परवानगी दिलेल्या आस्थापना, दुकाने याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणे आवश्यक असून याकरिता आस्थापना, दुकानासमोर सहा फुटाच्या अंतराने मार्किंग करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनाधारक, दुकानदारांवर सोपविण्यात आली तसेच दुकानामध्ये अथवा आस्थापनामध्ये एकाचवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती असणार नाहीत, याची खबरदारी दुकानदार, आस्थापनाधारकाने घ्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिलेले आहेत. या निर्देशाची अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी म्हणून वाशिम शहरातील काही दुकाने, आस्थापनांमध्ये पाहणी केली असता, दुकानांमध्ये पाच पेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्या तसेच दुकानांसमोर सहा फुटाच्या अंतराने मार्किंगही करण्यात आली नसल्याचे दिसून आले. जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रूग्ण नसला तरी धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे दुकान, आस्थापनांमध्ये होणारी गर्दी टाळणे आवश्यक ठरत आहे. दुकानांमध्ये गर्दी होणार यादृष्टिकोनातून प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
दुकानांमध्ये गर्दी; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 4:58 PM