वाशिम : आषाढी पौणिमेचे औचित्य साधून महिला भाविकांनी २३ जुलै रोजी किन्हीराजा येथिल मरिमायच्या मंदिरावर दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. गावावर येणारे संकट टळून गावात सुख, शांती नांदावी, यासाठी ग्रामदेवता मरिमायची पूजाअर्चा करून साकडे घालण्यात आले.
किन्हीराजा येथे गावाच्या पूर्व दिशेला गावालगत साधू भगत यांच्या शेतात मरिमायची स्वयंभू असलेली एक मूर्ती स्थापित आहे. संकटापासून सुटका करून घेण्यासाठी भाविक, ग्रामस्थ ग्रामदेवता मरिमायची पूजाअर्चा करून, गावावरील संकट टळण्यासाठी साकडे घालत असत. आजही दरवर्षी आषाढी पौर्णिमेच्या दिवशी गावातील महिला-पुरुष आपल्या मुलाबाळांसह मरिमायच्या मंदिरावर जाऊन मरिमाय देवीला पुरणपोळीचा नवैद्य व दहीभाताचे बोन दाखवून पूजाअर्चा करतात व गावावर येणारे संकट टळून गावात सुखशांती नांदावी, यासाठी साकडे घालतात. या वर्षीही आषाढी पौर्णिमेचे औचित्य साधून महिलांनी भरपावसात आपल्या मुलाबाळांसह मरिमायच्या दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.