शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेताला फाटा देत बाजारातील मागणीचा कल पाहून फूलशेतीकडे अनेक शेतकरी वळले. रोजच शेतातून किंवा सरळ दुकानदारांना विक्री होत असल्याने विक्रेते आणि खरेदीदार दोघांनाही सोयीचे होते. शेतकऱ्यांना पण रोजचा पैसा आवश्यक कामासाठी मिळत असल्याने आर्थिक बाजू समाधानकारक बनली होती.
कोरोनापूर्वी सर्व व्यवहार सुरू असल्याने मंदिर, पूजापाठ, लग्न सोहळा, स्वागत समारोह, सजावट आदींसाठी फुले, हार, बुके यांची प्रचंड मागणी होती. या व्यवसायातील होणारा फायदा पाहून अनेक जण याकडे वळले; पण कोरोनाचे संकट आले आणि सारे काही ठप्प झाले. ओळखीचे आणि नियमित असणारे ग्राहकच आता अधूनमधून फूल, हार नेतात. याच भरोशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करणारे आता मात्र अडचणींचा सामना करीत आहेत. यात शेतकरी ते विक्री करणारे दोघेही अडचणीत आले आहेत. दुकाने बंद झाल्याने मोठे नुकसान होत आहे. कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार, संचारबंदीचे नियम कधी शिथिल होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.