लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत २५ डिसेंबर रोजी आयोजित ४१ किलोमीटरच्या सायकल स्पर्धेत २१५ पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. वसुंधरेच्या संवर्धनासाठी सायकलस्वार सरसावल्याचे यावेळी आशादायक चित्र दिसून आले.महिला व पुरुष अशा दोन गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेला जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, आमदार राजेंद्र पाटणी, नगराध्यक्ष अशोक हेडा, मुख्याधिकारी दीपक मोरे, नगरसेवक राहुल तुपसांडे, करूणा कल्ले, बांधकाम विभागाचे घुगरे आदी मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्हा क्रीडा संकुलापासून स्पर्धा सुरू करण्यात आली. बसस्थानकमार्गे पोलीस स्टेशन, डॉ. आंबेडकर चौक, पाटणी चौक, लाखाळा, नागठाणा, रिठद व परत त्याच मार्गे जुने आरटीओ कार्यालयात स्पर्धेचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी माझे घर व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणार. निसर्गाशी संबंधित पृथ्वी, जल, वायू व आकाश या पंचतत्त्वावर आधारित पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणार. माझी वसुंधरा स्वच्छ, सुंदर, हरीत व पर्यावरणपुरक राखण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशा प्रकारची प्रतिक्षा सायकलस्वार स्पर्धकांना देण्यात आली. दरम्यान, स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांना २६ डिसेंबर रोजी बक्षिसांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी मोरे यांनी दिली.
वसुंधरेच्या संवर्धनासाठी सरसावले सायकलस्वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:28 PM