दागडियांचा अटकपुर्व जामीनअर्ज फेटाळला
By admin | Published: May 31, 2014 12:47 AM2014-05-31T00:47:36+5:302014-05-31T00:50:15+5:30
वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने महिंद्रा दागडीया व देवेंद्र मिश्रा यांचा अटकपुर्व जामीनअर्ज फेटाळला आहे.
वाशिम: कोट्यवधी रूपयांच्या खताची अवैधरित्या साठेबाजी करण्याच्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले करोडपती व्यावसायिक विजयकुमार ऊर्फ महिंद्रा दागडीया व कोरोमंडल खत कंपनीचे उप व्यवस्थापक देवेंद्र मिश्रा यांच्या अटकपूर्व जामिनावर आज ३0 मे रोजी येथे सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती भेंडे यांनी दोन्ही आरोपींचा अटकपुर्व जामीनअर्ज फेटाळून लावला आहे. दागडिया यांची पंचाळा फाटा व काटा रोडवर गोडाऊन आहेत. या गोडाऊनमध्ये कोरोमंडल कंपनीच्या खताचा मोठया प्रमाणात साठा असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार कृषी विभागाने गोदामांची तपासणी केली. यात काटा रोडवरील गोदामात एक कोटी ६८ लाख ४५ हजार रुपये किमतीचे ८८४ मॅट्रीक टन खत आढळून आले. जीवनावश्यक वस्तू कायदयानुसार व इतर अनेक कायद्यान्वये विजयकुमार ऊर्फ महिंद्रा दागडीया व कोरोमंडल कंपनीचे उपव्यवस्थापक देवेंद्र मिश्रा यांच्याविरूध्द वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर दागडीया व मिश्रा दोघेही गायब झाले; मात्र त्यांनी वाशिम येथील न्यायालयात अटकपूर्व जामीन घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्तींनी आज ३0 मे रोजी अटकपुर्व जामीनाच्या अर्जावर सुनावणी केली. न्यायाधीश भेंडे यांनी दागडिया व मिश्रा या दोघांचाही अटकपुर्व जामीन आज ३0 मे रोजी फेटाळून लावला. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर फार मोठे घबाड उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहेत.