वाशिम तालुक्यात रविवारी रात्री ८ ते रात्री दहा वाजेपर्यंत जाेरदार पाऊस झाला. पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन खरडली असून, नुकतेच उगवत असलेल्या पिकांचेही काही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. वाशिम ते मंगरूळपीर रस्त्यावर हाेत असलेल्या पावसामुळे रस्ता दिसेनासा झाल्याने रस्त्याच्या कडेला वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. रविवारी झालेेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तसेच शेतीमधील नुकसानाचे पंचनामे त्वरित करण्याची मागणीही शेतकऱ्यांतून केली जात आहे.
.................
कारंजा - मानोरा रस्ता कामामुळे शेतीमधील पिकांचे नुकसान
मानोरा : कारंजा मानोरा रोडचे काम सुरू आहे. ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, उल्हासनगर मुंबई या कंपनीमार्फत हे काम करीत असताना पुलाचे काम करण्यात आले. मात्र, नाल्या व्यवस्थित न काढल्याने वाहून जाणारे पाणी शेतात गेल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.
मानोरा कारंजा रोडवर धामणी मानोरा शिवारात सुरज पाटील व विनोद भिकाजी पाटील यांच्या शेताजवळ उंच पुलाचे काम करण्यात आले. मात्र, वाहून जाणारे पाणी नाली खोदून व्यवस्थित न काढल्याने सर्व पाणी शेतात गेले. परिणामी सोयाबीन, तूर पिकाचे नुकसान झाले आहे. संबंधीत कंपनी यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी सुरज रमेश पाटील यांनी केली आहे. याबाबत कंपनीचे अधिकारी लोकनाथ पत्रा यांना प्रतिक्रिया विचारण्यास फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.