लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाकाळात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारी रुग्णालयांतील नेत्र शस्त्रक्रिया विभाग प्रभावित झाल्याने, नेत्रशस्त्रक्रियेत कमालीची घट आली आहे. २०१९ मध्ये १,३०० तर २०२० मध्ये केवळ ११० नेत्रशस्त्रक्रिया झाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत कोरोनाबाधित रुग्ण आणि संदिग्ध रुग्णांच्या उपचारार्थ तैनात असल्याने, कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया प्रभावित झाल्या होत्या. या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांतील नेत्र शस्त्रक्रिया विभागही जवळपास बंदच होते. नेत्र शस्त्रक्रियांचे रुग्ण शक्यतोवर वयस्क, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी गटांतील असल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यापासून सरकारी रुग्णालयांतील सर्व शस्त्रक्रिया विभाग पूर्ववत झाले असून, नेत्रशस्त्रक्रियाही सुरू झाल्या. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जानेवारी महिन्यापासून नेत्रांशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांची रांग लागत असल्याचे दिसून येते. २०२० मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर या दरम्यान नेत्रशस्त्रक्रिया ठप्प असल्याने नेत्रशस्त्रक्रियांत मोठी घट आल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये सरकारी रुग्णालयात १,३०० नेत्र शस्त्रक्रिया झाल्या होत्या, तर २०२० मध्ये केवळ ११० शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
या कारणांमुळे ठप्प होत्या शस्त्रक्रियाकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन काळात आरोग्य विभागानेही अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या होत्या. त्याचा फटका जिल्ह्यातील नेत्र रुग्णांनाही बसल्याचे दिसून येते. नेत्र शस्त्रक्रियेचे रुग्ण शक्यतोवर वयस्क, अतिजोखमीच्या गटातील असल्याने आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित, तसेच संदिग्ध रुग्णांवर उपचार सुरू असल्याने, कोणताही धोका नको, म्हणून कोरोनाकाळात नेत्रशस्त्रक्रिया विभाग जवळपास बंदच होता.
कोरोनाकाळात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आरोग्य यंत्रणा व्यस्त होती. कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने नेत्रशस्त्रक्रिया विभाग पूर्ववत झाला आहे. नेत्राशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी सरकारी दवाखान्यातील नेत्र विभागाशी संपर्क साधावा.- डॉ. मधुकर राठोड,जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम