कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जास्तीत-जास्त कोरोना चाचणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार यंत्रणा कामही करीत आहेत. २७ फेब्रुवारी रोजी शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रात १० जणांचे नमुने घेण्यात आले. या नमुन्याचा अहवाल ३ मार्च रोजी दुपारपर्यंत ही प्राप्त झाला नाही. साधारणतः ३६ तासात अहवाल प्राप्त होत असतात. हे नमुने अद्यापही तपासणीसाठी पाठविण्यात आले नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली. एकीकडे शासन व यंत्रणा जास्तीत जास्त चाचणी करण्यासाठी आग्रह धरत आहे तर दुसरीकडे चाचणीसाठी घेतलेल्या नमुन्याचे अहवाल पाठविण्यास व प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने संदिग्ध रुग्णांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. कोेरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे तर दुसरीकडे तालुका पातळीवरील आरोग्य यंत्रणा कोरोना तपासणीसाठी घेतलेले स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात विलंब करीत असल्याचे दिसून येते.
.......
कोरोना चाचणीसाठी घेतलेले स्वॅब नमुने साधारणतः ६ ते २४ तासात प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणे आवश्यक आहे. पाच दिवसांपूर्वी घेतले नमुने अद्यापही तपासणीसाठी न पाठविणे ही गंभीर बाब आहे.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम