तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीमध्ये करण्यात येणाऱ्या सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी सगळ्यांत अधिक मागणी असणाऱ्या महाबीज या कंपनीचे बियाणे कमी आणि ज्यांच्यावर विश्वास नाही, अशा इतर १८ कंपन्यांच्या चौपट बियाण्यांचा पुरवठा तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांना करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. महाबीज या शेतकऱ्यांच्या विश्वासपात्र असलेल्या बियाणे कंपनीव्यतिरिक्त इतर १८ कंपन्यांचे २७९८ क्विंटल बियाणे तालुक्यामध्ये प्राप्त झाले. महाबीज कंपनीचे केवळ ७५७ क्विंटल पुरवठा झालेले सोयाबीनचे बियाणे संपल्याचेही तालुका कृषी प्रशासन सांगत आहे. शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीच्या बियाण्यांवर विसंबून न राहता इतर कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात येत आहे, हे विशेष.
मागील वर्षीच्या बनावट बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांच्या सोयाबीन या नगदी पिकाचा हंगाम मातीमोल झाल्याच्या पार्श्वभूमीवर, शासन शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचविण्यासाठी, शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे महाबीज कंपनीचे प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देईल, ही शेतकऱ्यांची भाबडी आशा मात्र इतर १८ कंपन्याचे जास्त बियाणे उपलब्ध करून दिल्याने फोल ठरली आहे.
शेतकऱ्यांना आवश्यक असलेले महाबीजचे बियाणे उपलब्ध नसल्याचे कारण सांगून खासगी विक्रेते इतर कंपन्यांचे सोयाबीन बियाणे अव्वाच्या सव्वा दराने शेतकऱ्यांच्या माथी मारून प्रचंड नफा कमवीत असल्याचा लेखी आरोप परिवर्तन शेतकरी संघटनेकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आला आहे.
कृषिमाल विक्रेते शेतकऱ्यांना नाडत असल्यामुळे तातडीने भरारी पथकांद्वारा कृषी सेवा केंद्रधारकांच्या एकूण व्यवहाराची चौकशी करण्यात येऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणीही परिवर्तन शेतकरी संघटनेकडून करण्यात आलेली आहे.