मुस्लीम स्मशानभूमीत सुविधांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:39 AM2021-05-15T04:39:47+5:302021-05-15T04:39:47+5:30
शिरपूर जैन : येथील मुस्लीम स्मशानभूमीत पिण्याचे पाणी, पेवर ब्लॉक, विद्युत व्यवस्था, रस्ता आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची ...
शिरपूर जैन : येथील मुस्लीम स्मशानभूमीत पिण्याचे पाणी, पेवर ब्लॉक, विद्युत व्यवस्था, रस्ता आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मुस्लीम समाज बांधवांनी पंचायत समितीकडे निवेदनाद्वारे केली.
..................
नादुरुस्त रपट्यांवर लोखंडी जाळ्या
शिरपूर जैन : येथील मुख्य रस्त्यांवरील विविध ठिकाणच्या रपट्यांना भगदाड पडली होती. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली होती. स्थानिक प्रशासनाने तात्पुरता उपाय, म्हणून या भगदाडांवर लोखंडी जाळ्या टाकल्याने अडचण निकाली निघाली आहे.
................
शिरपूर-भेरा रस्त्याचे अद्याप अपूर्ण
मालेगाव : तालुक्यातील शिरपूर जैन ते भेरा या ४.६० किलोमीटर रस्त्याचे काम २० महिन्यांचा कालावधी झाला, तरीही अपूर्णावस्थेतच आहे. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी शिरपूर येथील शेतकऱ्यांमधून होत आहे.
................
बांधबंदिस्तीची कामे जोरात सुरू
मानोरा : कृषी विभागाच्या वतीने पाणलोट विकास योजनेंतर्गत शेतात बांधबंदिस्तीची कामे सध्या जोरात सुरू आहेत. पाणलोट विकास योजनेंतर्गत मृद व जलसंधारणाची कामे केली जात असून, शेतकऱ्यांचा यामुळे फायदा होणार आहे.
.........................
कूपनलिकांची पाणी पातळी खालावली
वाशिम : शहरातील अनेक भागातील खासगी कूपनलिका आटल्या आहेत, तर आटण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न येत्या काही दिवसांत गंभीर होणार असल्याचे संकेत निर्माण झाले आहेत.
..................
‘हायमास्ट लाइट’ ठरत आहेत शोभेची वस्तू
वाशिम : ४६१ ‘बी’ या राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर येथे जंक्शन परिसरात उभारण्यात आलेले ‘हायमास्ट लाइट’ अद्याप सुरू झालेले नाहीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार उद्भवला असून, नागरिकांमधून या प्रती संताप व्यक्त केला जात आहे.
......................
रोहयोची कामे मिळेना; मजूर हैराण
अनसिंग : महानगरात रोजगारासाठी पुणे, मुंबईत गेलेले शेकडो कामगार कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे परतले आहेत. त्यामुळे अनेक गावांत कामगारांची संख्या वाढली असताना, रोहयोची कामे मिळत नसल्याने संबंधित मजूर हैराण झाले आहेत.
.................
वीजपुरवठ्यात व्यत्यय; नागरिक त्रस्त
वाशिम : गत काही दिवसांपासून मोहरी (ता.मंगरूळपीर) परिसरातील गावांत विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. शुक्रवारीही दुपारच्या सुमारास असाच प्रकार घडल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
................
वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी
वाशिम : शहराबाहेरच्या शेलू फाट्यानजीक वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तळ ठोकून शुक्रवारी प्रत्येक वाहनचालकांकडील कागदपत्रांची तपासणी केली. नियम तोडणाऱ्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली.
................
आधार केंद्र सुरू करण्याची मागणी
वाशिम : कोरोनामुळे जनता आधीच अडचणीत असताना अनेक ठिकाणचे आधार केंद्रही बंद आहेत. त्यामुळे बँक व्यवहारांसह विविध शासकीय कामांत अडचणी येत असल्याने जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागांसह शहरी भागांत आधार केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
.................
पाणीटंचाई उपाययोजना राबविण्याची मागणी
मेडशी : मेडशी जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
.................
मजुरांना रोजगार देण्याची मागणी
इंझोरी : परिसरातील गावातून रोजगारासाठी परजिल्ह्यात गेलेले शेकडो कामगार गावी परत आले आहेत. मात्र, परिसरात शेतीशिवाय कोणतीच कामे नसल्याने हे कामगार बेरोजगार झाले आहेत. प्रशासनाने या कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
.....................
रेतीअभावी रखडली घरकुलांची कामे
वाशिम : चालू वर्षीही अद्याप जिल्ह्यात एकाही रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. ही परिस्थिती गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कायम आहे. यामुळे रेती मिळेनाशी झाल्याने, विशेषत: घरकुलांची कामे रखडली आहेत.
.................
माहुरवेशीच्या डागडुजीची मागणी
वाशिम : शहरातील पुराजन माहुरवेशीची पडझड झाली असून, हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तथापि, वेशीची डागडुजी करून साैंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी श्याम उफाडे यांनी केली.
...............
केनवड भागात पाणंद रस्त्याची दुरवस्था
वाशिम : केनवड जिल्हा परिषद गटातील पाच पाणंद रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने, शेतात जाताना शेतकऱ्यांची पुन्हा गैरसोय होणार. त्यामुळे पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे.