वंचित बहुजन, जनविकास आघाडीची युती; महाविकास आघाडीचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:51 AM2021-09-16T04:51:41+5:302021-09-16T04:51:41+5:30
संतोष वानखडे वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी ५ आॅक्टोबर २०२१ रोजी मतदान होणार ...
संतोष वानखडे
वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी ५ आॅक्टोबर २०२१ रोजी मतदान होणार आहे. एकिकडे वंचित बहुजन आघाडी आणि जनविकास आघाडीची युती झालेली असताना दुसरीकडे शिवसेना, कॉंग्रेस आणि राकॉंच्या महाविकास आघाडीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडी होणार की प्रतिष्ठेच्या जागेवरून बिघाडी होणार? याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून आहे.
७ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी निवडणूक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी ५ आॅक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंंग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केलेली आहे. राज्याच्या सत्तेत महाविकास असल्याने जिल्हा परिषद पोटनिवडणुकीला वाशिम जिल्ह्यात तिन्ही पक्ष एकत्रितरित्या सामोरे जाणार की एकमेकांविरोधात उभे ठाकणार? याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. तिन्ही पक्षातर्फे जि.प. गट व पं.स. गणात स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीसंदर्भात जिल्हास्तरावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याने इच्छुक उमेदवारही संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येते. प्रतिष्ठेच्या काही जागेवरून महाविकास आघाडीचे घोडे अडल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. दुसरीकडे युवा नेते अॅड. नकुल देशमुख यांची जनविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीने युती करीत प्रतिस्पर्ध्यांसमोर तगडे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. पोटनिवडणुकीमुळे वातावरण पुन्हा तापले असून, राजकीय घडामोडींनीदेखील वेग घेतला आहे. पोटनिवडणुकीत नंबर वन कोण ठरतो? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
......................
जिल्हाध्यक्ष काय म्हणतात?
कोट
पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीबाबत अद्याप काही ठरले नाही. पक्षाच्या वरिष्ठांच्या निर्णयानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची पोटनिवडणूक लढविली जाईल.
- अमित झनक
जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस वाशिम
.............
पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी युती झालेली आहे. जनविकास आणि वंचित आघाडी पोटनिवडणुकीला एकत्रितपणे व संपूर्ण ताकदनिशी सामोरे जाणार आहे.
- अॅड. नकुल देशमुख
प्रमुख, जनविकास आघाडी
............
इतर पक्षांच्या जिल्हाध्यक्ष किंवा नेत्यांशी अद्याप चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीसंदर्भात वरिष्ठांच्या सूचनेनुसार निर्णय घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.
- चंद्रकांत ठाकरे
जिल्हाध्यक्ष, राकॉं वाशिम
........
पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीबाबत इतर पक्षांच्या जिल्हाध्यक्षांशी चर्चा झालेली नाही. याबाबत वरिष्ठ स्तरावर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.
- सुरेश मापारी,
जिल्हाध्यक्ष, शिवसेना वाशिम
..................
जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीत जनविकास आघाडीसोबत युती करण्यात आलेली आहे. लवकरच संयुक्त बैठक घेऊन पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे.
- रवीन्द्र देशमुख
जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी