१५ दिवसांत लसीचे ३० हजार डोस मोफत देण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 12:41 PM2021-06-07T12:41:25+5:302021-06-07T12:41:34+5:30
Corona Vaccine : समता फाऊंडेशन रिसोड या सामाजिक संघटनेने लसीचे ३० हजार डोस मोफत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण राज्यात बंद असले तरी रिसोड शहरातील १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. याचे कारण म्हणजे समता फाऊंडेशन रिसोड या सामाजिक संघटनेने लसीचे ३० हजार डोस मोफत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाला ५ जूनपासून रिसोड शहरात प्रारंभ झाला आहे.
समता फाऊंडेशनचे अध्यक्ष पुरूषोत्तम अग्रवाल यांची रिसोड ही जन्मभूमी आहे. रिसोडच्या विकास कार्यामध्ये तसेच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो. कोरोना महामारीमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या दरम्यान, मदतीचा हात पुढे करणारे काही सद्गृहस्थदेखील समोर येत आहेत. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. वयोगटानुसार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून, लसीचा तुटवडा असल्याने गत १५ दिवसांपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात येत आहे. नेमका याच वयोगटातील नागरिकांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका असल्याने सर्वांचे लसीकरण व्हावे या उदात्त हेतूने समता फाऊंडेशनने रिसोड शहरातील १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी लसीचे ३० हजार डोस मोफत देण्याचा संकल्प केला. रिसोड शहराची लोकसंख्या ४५ हजारांच्या घरात आहे. १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या २४ हजारांच्या आसपास आहे. शहरातील तीन केंद्रात दररोज १५०० डोस देण्याचे नियोजन आहे. शहरातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून समता फाउंडेशनने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
रिसोड शहरात तीन केंद्रांमध्ये लसीकरण
रिसोड शहरातील तीन केंद्रांमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. कुठेही गोंधळ, गर्दी दिसून येत नाही.