विस्थापित मजूरांना रेशनकार्डशिवाय मिळणार मोफत तांदूळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 11:42 AM2020-05-22T11:42:40+5:302020-05-22T11:42:54+5:30

मजूर, कामगारांना रेशनकार्ड नसतानाही, मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येणार आहेत.

Displaced workers to get free rice without ration card! | विस्थापित मजूरांना रेशनकार्डशिवाय मिळणार मोफत तांदूळ !

विस्थापित मजूरांना रेशनकार्डशिवाय मिळणार मोफत तांदूळ !

Next

वाशिम : लॉकडाउनच्या कालावधीत परराज्य, परजिल्ह्यातून जिल्ह्यात आलेल्या विस्थापित मजूर, कामगारांची गैरसोय होऊ नये म्हणून केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत या मजूर, कामगारांना रेशनकार्ड नसतानाही, मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येणार आहेत.
देशातील कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांसाठी एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तसेच एपील शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपील (केशरी) शिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्याच्या कालावधीत सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे. तथापि, या योजनांव्यतिरिक्त विना शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ दिला नाही. आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत जे विस्थापित मजूर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेच्या शिधापत्रिका नाहीत, त्यांना मे व जून २०२० या दोन महिन्याकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय १९ मे रोजी घेण्यात आला.
शासनाच्या या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधील शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यांना शिधापत्रिका प्राप्त न झालेल्या व्यक्ती, अन्न धान्याची गरज असलेले सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर अशा विनाशिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. याकरिता ग्रामीण भागातील पात्र व्यक्तींनी कोविड प्रतिबंध ग्रामरक्षा समिती अथवा रास्तभाव दुकानदार यांच्याकडे तसेच शहरी भागातील व्यक्तींनी आपल्या वार्डातील अथवा नजीकच्या रास्तभाव दुकानदाराकडे आपल्या कुटुंबातील व्यक्तींची नावे व आधारक्रमांक आदी माहिती सादर करावी लागणार आहे.

विस्थापित मजूर, कामगारांना आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येणार आहेत. याकरीता वाशिम जिल्ह्यातील लाभार्थींनी संबंधित रेशन दुकान, कोविड प्रतिबंध ग्रामरक्षा समिती यांच्याकडे आवश्यक ती माहिती सादर करावी.
- राजेंद्र जाधव
जिल्हा पुरवठा अधिकारी वाशिम

Web Title: Displaced workers to get free rice without ration card!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.