जिल्ह्यात गतवेळच्या खरीप हंगामात सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे विविध शेतीपिकांसह फळपिकांना मोठा फटका बसून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी कृषी व महसूल विभागाकडून करण्यात आली. त्यानुसार, १९२ गावांतील ९,५५२ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या. या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडून ३ कोटी १८ लाख २० हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. जिल्हास्तरावर हे अनुदान प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी तालुकास्तरावर तहसील कार्यालयाकडे हा निधी वर्ग केला. त्यानंतर, तालुकास्तरावरून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार ८,७०९ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात ३ कोटी १८ लाख १३ हजारांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे.
------
आपत्तीचा सर्वाधिक फटका मालेगावला
गतवर्षीच्या खरीप हंगामात जून ते ऑक्टोबरदरम्यान विविध नैसर्गिक आपत्तीचा फटका जिल्हाभरातील शेतकऱ्यांना बसला. तथापि, नुकसानाचे सर्वाधिक प्रमाण मालेगाव तालुक्यात असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. या तालुक्यातील १०४ गावांत अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे तब्बल ४ हजार १८१ शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे, फळपिकांचे अतोनात नुकसान झाले.
----------------
अनुदान वितरणाची स्थिती
तालुका शेतकरी वितरित निधी (लाखात)
वाशिम ११६ २.८४
मालेगाव ३५१३ १७६.५८
रिसोड २७८५ ७४.३५
मं.पीर १७५३ ५४.४३
मानोरा ६१ ०.७८
कारंजा ४८१ ९.१४
--------------------