मंगरुळपीर: यंदा अपुऱ्या पावसामुळे पशूधनाच्या चाºयाची समस्या गंभीर रूप धारण करीत असतानाच परराज्यातील मेंढपाळ हजारो शेळ्या, मेंढ्यांसह जिल्ह्यात दाखल झाले असून, हे पशू आधीच कमी होत असलेल्या चाºयावर ताव मारत असल्याने जिल्ह्यातील पशूपालकांवर जनावरे चराईचे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती उत्पादनात घट आली असून, प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रकल्पांतील पाणी आरक्षीत करून सिंचन उपसा बंद केला आहे. प्रकल्पातून शेतीसाठी उपसा करणाºया शेतकºयांच्या वीज जोडण्याही खंडीत करण्याची मोहिम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे; परंतु जनावरांच्या चाºया, पाण्याची समस्या गंभीर होत असताना मात्र त्याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष नाही. जिल्ह्यात अपुºया पावसामुळे कृषी उत्पादन घटले असल्याने जनावरांच्या चाºयाची समस्याही बिकट झाली आहे.त्यामुळे शेकडो पशूपालक जनावरांची विक्री करण्यावर भर देत असल्याचे पशू बाजारातील चित्रावरून स्पष्ट होत आहे. त्यातच परराज्यातील मेंढपाळ आपल्या हजारो शेळ्या, मेंढ्या घेऊन वाशिम जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मालेगाव, रिसोड, मानोरा, कारंजा, मंगरुळपीर आणि वाशिम या सर्वच तालुक्यातील कुरणांमध्ये परराज्यातील शेळ्या, मेंढ्या चारण्यात येत आहेत. राजस्थान, आणि मध्यप्रदेशासारख्या राज्यातील पशूपालक दरवर्षीच जिल्ह्यात दाखल होतात. त्यामुळे जिल्ह्यातील पशूंच्या चराईचा प्रश्न गंभीर होत असतो. यंदाही परराज्यातील पशूपालक मोठ्या प्रमाणात जनावरे घेऊन जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ई-क्लास जमीन, गायराने आणि शेतशिवार परिसरात ही जनावरे चारण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पशूंचा चारा ते खात आहेतच शिवाय गावशिवारातील तळे, प्रकल्पातील पाण्याचाही आधार ते घेत आहेत. या प्रकाराकडे महसूल किंवा इतर संबंधित प्रशासनाचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष आहे. विशेष म्हणजे, हे मेंढपाळ नेमके कोण्या राज्यातून आले आहेत. त्यांची ओळख काय, याची काहीही माहिती प्रशासनाकडे असल्याचे दिसत नाही.