वाशिम : मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार, आता २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेतील ‘वंचित गट व दुर्बल गटा’च्या व्याख्येत बदल करण्यात आले असून, उर्वरीत प्रवेश प्रक्रिया या नवीन व्याख्येनुसार पार पडणार आहे. मात्र, १२ जूनपासून वाशिम जिल्ह्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याचे संकेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले. शिक्षण हक्क कायद्याने दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. वंचित गट व दुर्बल गटासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि.जा. (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (ओबीसी) व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) यांचा समावेश करण्यात आला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे अनुषंगाने एचआयव्ही बाधित, एचआयव्ही प्रभावित बालकांचाही समावेश केला. उपरोक्त सुधारणेप्रमाणे शिक्षण विभागाने मोफत प्रवेश प्रक्रियेत ‘वंचित गट व दुर्बल गटा’च्या व्याख्येत बदल केले असून, आतापर्यंत वाटप झालेल्या प्रवेशाच्या जागा सोडून उर्वरीत रिक्त जागांसाठी उपरोक्त सुधारित व्याख्येप्रमाणे अर्ज मागविण्यात आले. याची अंतिम मुदत १३ जून अशी करण्यात आली आहे. यापूर्वी ज्या बालकांना, पालकांना सदर योजनेचा अर्ज भरता आलेला नाही, त्यांनाही सदर आॅनलाईन प्रणालीमध्ये अर्ज भरता येणार आहे. मात्र, १२ जूनपासून तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने अर्ज सादर करणे अशक्य झाले आहे. १३ जून रोजीदेखील पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज सादर करता आले नाहीत. तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ही समस्या उदभवली, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली जाईल, असे शिक्षण विभागाने सांगितले. जिल्ह्यात मोफत प्रवेशासाठी ११७३ जागा असून, आतापर्यंत ७२२ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली असून, ५२६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. उर्वरीत प्रवेश नवीन पद्धतीनुसार होणार आहेत.
तांत्रिक अडचणींमुळे मोफत आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 4:28 PM
वाशिम जिल्ह्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याचे संकेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले.
ठळक मुद्दे, आतापर्यंत वाटप झालेल्या प्रवेशाच्या जागा सोडून उर्वरीत रिक्त जागांसाठी उपरोक्त सुधारित व्याख्येप्रमाणे अर्ज मागविण्यात आले. मात्र, १२ जूनपासून तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने अर्ज सादर करणे अशक्य झाले आहे.१३ जून रोजीदेखील पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज सादर करता आले नाहीत.