वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या डव्हा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत वर्गखोल्यांची कमतरता भासत आहे. त्यावर पर्याय म्हणून चक्क गावातील नाथनंगे महाराज संस्थानच्या खोल्यांमध्येच शाळा भरवण्याची वेळ शाळा व्यवस्थापन समितीसह शिक्षकांवर ओढवली आहे. विशेष म्हणजे संस्थानच्या एकाच खोलीत तीन वर्गाच्या विद्यार्थ्यांना बसवून ज्ञानार्जन करावे लागत असल्याने शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा सुरू असल्याचे दिसत आहे.
डव्हा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशा प्रमाणात वर्गखोल्या नाहीत. सात वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी सुस्थितीत केवळ दोनच वर्गखोल्या आहेत. उर्वरित वर्गखोल्या पूर्णत: जीर्ण झाल्या असून एखादप्रसंगी वर्गखोलीचा मलबा अथवा भिंत कोसळून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. पाऊस झाल्यास अनेक वर्गखोल्यांमध्ये पाणीच पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यावे, असा प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहे.
शाळेत वर्गखोल्यांची कमतरताअपुऱ्या व धोकादायक वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागाच नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने पालक व शाळा व्यवस्थापन समितीने गावातील नाथनंगे महाराज संस्थानच्या खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांची बसण्याची तात्पुरती व्यवस्था केली. मात्र तिथेही एकच खोली उपलब्ध असून त्यात तीन वर्गाच्या विद्यार्थ्यांना बसवून ज्ञानार्जन करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.