-----------
तुरीचे दर साडेसहा हजारांवर
वाशिम : जिल्ह्यात तुरीच्या दरातील तेजी कायमच असून, मंगळवारी या शेतमालाचे दर ६५०० रुपये क्विंटलच्यावर पोहोचल्याचे दिसून आले. कारंजा बाजार समितीत अधिकाधिक ६,५५० रुपये प्रतिक्विंटल दराने मंगळवारी तुरीची खरेदी झाली, तर आवकही २७५० क्विंटल झाली होती. वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
---------
अमानी येथे आरोग्य उपकेंद्राला मंजुरी
पांगरी नवघरे : मालेगाव तालुक्यातील अंमानी येथे आरोग्य सुविधा प्राप्त व्हावी तथा गावातील परिसरातील रुग्णांना तातडीने व वेळेवर उपचार व्हावा यासाठी जि.प. सदस्य रत्नमालाबाई उंडाळ यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अमानी येथे आरोग्य उपकेंद्राला शासनाकडून मंजुरी मिळाली असून, ते लवकर पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
^^^^^
सिलिंडर स्फोटप्रकरणी
शेलूबाजार : शेंदुरजना मोरे नजीक समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली सिलिंडर विस्फोट होऊन वाहनाचा चुराडा झाला होता. ११ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी मंगरुळपीर पोलिसांनी सोमवार, १८ जानेवारी रोजी वाहनचालक व संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.
---------
कुत्र्याच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू
शेलूबाजार : वनोजा येथे मंगळवारी एक माकड कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने माकडाचा मृत्यू झाला. कुत्र्यांच्या हल्ल्यात माकड गंभीर जखमी झाल्याची माहिती वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीमच्या वनोजा शाखेतील सदस्यांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले; परंतु ते पोहोचण्यापूर्वीच माकडाचा मृत्यू झाला.
-------------
पोहरादेवीत शाळांचे निर्जंतुकीकरण
पोहरादेवी : येत्या २७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वीच्या शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात येत असून, पोहरादेवी परिसरातील जि.प. शाळांचे निर्जंतुकीकरण आणि साफसफाई मंगळवारपासून सुरू करण्यात आली. मानोरा शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ही मोहीम राबविली जात आहे.