वाशिम परिसरात भूकंपासम धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:26 AM2021-07-12T04:26:12+5:302021-07-12T04:26:12+5:30
वाशिममध्ये सकाळपासून काही लोकांनी व्हाॅटस्ॲपवर साैम्य स्वरूपात भूकंपाचे धक्के बसल्याचे संदेश प्रसारित केले. सकाळी साधारणत: साडेआठ वाजता घडलेल्या या ...
वाशिममध्ये सकाळपासून काही लोकांनी व्हाॅटस्ॲपवर साैम्य स्वरूपात भूकंपाचे धक्के बसल्याचे संदेश प्रसारित केले. सकाळी साधारणत: साडेआठ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे घरातील टेबल, खुर्ची, पलंग, सोफा यांसह इतर वस्तू हादरल्याचे नागरिक सांगत आहेत. याविषयी दिवसभर शहराच्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती.
................
अनसिंगच्या ठाणेदारांना झाली अनुभूती
वाशिम तालुक्यातील अनसिंग पोलीस ठाण्याच्या ठाणेदार नयना पोहेकर यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या संदेशात नमूद केले की, रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना घरासमोर उभी केलेली गाडी हलताना दिसली.
वाशिमच्या शुक्रवार पेठ भागात वास्तव्याला असलेले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्याध्यक्ष माधवराव अंभोरे यांनीही सकाळी साडेआठच्या सुमारास भूकंपासम धक्के बसल्याचे सांगितले. शहरातील दत्तनगरात राहणाऱ्या नर्गीस अंजुम, रूपाली इंगळे यांनीही सकाळी भूकंपासम धक्के बसले, असे सांगितले.
...................
कोट :
नजीकच्या यवतमाळ जिल्ह्यातील नरखेड, महागाव आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी सकाळच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याची अधिकृत नोंद आहे. मात्र वाशिम परिसरात असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. तशी अधिकृत नोंदही झालेली नाही.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम