वाशिम: शाळेच्या नियमात न बसणारे काम नियमात बसविण्यासाठी एका शिक्षण संस्था चालकाने माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांच्याशी १५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास हुज्जत घातली. या घटनेचा शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने निषेध नोंदविला.
शाळेशी संबंधित काम घेऊन मानोरा येथील एका शिक्षण संस्थेचे चालक हे गुरूवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात आले. नियमात न बसणारे काम करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. नियमाला डावलून कोणतेही काम करणारा नसल्याचा ठाम पवित्रा शिक्षणाधिकारी तांगडे यांनी घेतला. यावरून शाब्दीक वाद घालत त्या संस्था चालकाने शिक्षणाधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात नेमके काय घडले? हे पाहण्यासाठी अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कर्मचारी जमल्याचे पाहून, संबंधित संस्था चालकाने कार्यालय सोडणे पसंद केले. या घटनेचा शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने निषेध नोंदविला. शिक्षणाधिकाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या संस्था चालकावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.