रिअॅलिटी चेक
शिरपूर जैन : लसीकरण व कोरोना चाचणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले पीपीई किट तसेच मास्क, हॅन्डग्लोज व सॅनिटायझरही मिळत नसल्याचा प्रकार शिरपूर येथे १२ एप्रिलला समोर आला. पीपीई किट तसेच हॅण्डग्लोज न घालताच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेतले जात असल्याचे सोमवारी दिसून आले.
कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. कोरोना चाचणीदरम्यान संदिग्ध रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्याची जबाबदारी शिरपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातील काही कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. शिरपूर अरोग्यवर्धिनी केंद्रात १९ फेब्रुवारीपासून कोरोना चाचणी केली जात आहे. चाचणी करतेवेळी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशा प्रमाणात मास्क, हॅन्डग्लोज व सॅनिटायझर मिळणे गरजेचे आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या कर्मचाऱ्यांना हे साहित्य योग्य प्रमाणात उपलब्ध होत नसल्याची माहिती होती. यासंदर्भात सोमवारी (दि.१२) रिअॅलिटी चेक केले असता आरोग्य कर्मचाऱ्याने पीपीई किटशिवाय तसेच हॅण्डग्लोजचा वापर न करताच संदिग्ध रुग्णांचे स्वॅब घेतले. त्यामुळे चाचणी करणारा व करून घेणाऱ्यास कोरोना संसर्गाचा धोका अधिक प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीे. पीपीई किटचा अभाव असेल तर किमान मास्क, सॅनिटायझर व हॅन्डग्लोज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.