वाशिम - जिल्ह्यातील पाच तालुक्यात ‘लम्पी’चा शिरकाव झाला असून, एका जनावराचा मृत्यू झाल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. लम्पी चर्मरोगाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला.
लम्पी हा गोवंश व म्हैसवर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा वाकद (ता.रिसोड) येथील जनावरांना लम्पीचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाकदपासून जवळच असलेल्या खडकी सदार येथेही काही जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला. मानोरा तालुक्यातील भूली येथे एक, वाशिम तालुक्यातील कामठवाडा येथे एका जनावराला लम्पी आजाराचा संसर्ग झाल्याचे समोर आले. याबरोबरच कारंजा तालुक्यातील बांबर्डा व मंगरूळपीर तालुक्यातील पेडगाव येथे लम्पीसदृश आजाराने ग्रस्त प्रत्येकी एक जनावर आढळल्याने, पाहणीसाठी पशुसंवर्धन विभागाची चमू बुधवारी गावात दाखल झाली.