रिसोड तालुक्यात मंगळवार, ९ मार्चपासून ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. कृषी सहायक ईरेश कचकलवार यांनी तालुक्यातील वाकदवाडी, वाकद, वडजी या गावांत ग्राम कृषी विकास समितीची स्थापना केली आहे.
स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य, शेतकरी गटांचे प्रतिनिधी, महिला बचत गटाचे प्रतिनिधी, कृषिपूरक व्यावसायिक, शेतकरी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांचा समावेश आहे. समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून सरपंच आहेत. स्थापन करण्यात आलेल्या समित्या शेतकऱ्यांच्या सर्वच समस्येच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. शेती हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा व्यवसाय आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था शेतीवर निगडित आहे. हवामानातील बदल, लहरी पर्जन्यमान, कीड व रोग, शेतमालाच्या दरामध्ये अचानक होणारी घसरण, आदी बाबींचा विचार करून शेतीमधून शाश्वत उत्पन्न मिळेल याकरिता राज्यातील कृषी विभागाने ग्रामपातळीवर विचारविनिमय करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता ग्राम कृषी विकास समितीची स्थापना केली आहे. ग्राम कृषी विकास समितीची स्थापन गावोगावी करण्याकरिता जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक गावोगावी ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करीत आहेत.