वाशिम : अंधारलेल्यांचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी नेत्रदानाच्या उपक्रमाला चळवळीचे स्वरुप येणे आवश्यक आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. त्यामुळे नेत्रदानाचा संकल्प प्रत्येकाने करावा व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे. नेत्रदान हेच श्रेष्ठदान असल्याचे मत वाशिम शहरातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. स्वीटी गोटे यांनी गुरूवारी व्यक्त केले. ‘लोकमत’शी संवाद साधताना त्यांनी नेत्रदानाचे महत्व, नेत्रदान कोण करू शकते, अंधत्वाची कारणे, डोळ्यांची निगा राखणे आदी विषयावर उपयुक्त माहिती दिली.
प्रश्न : नेत्रदानाबाबत आपण काय सांगाल?नेत्र दान म्हणजे दात्याच्या मृत्यूनंतर त्याचे/ तीचे डोळे दुसºया कोणाला तरी दान करणे. ज्यांचे डोळे कॉर्नियल इन्फेक्शनमुळे खराब झाले आहेत, त्यांना नेत्रदानाचा फायदा होतो. ज्या लोकांना बुबुळाच्या विकारामुळे अंधत्व आले आहे, अशा लोकांना दृष्टी प्रदान करण्यासाठी नेत्रदानाचा टक्का वाढणे आवश्यक आहे.
प्रश्न : अंधत्वाची कारणे काय सांगता येतील?उत्तर : अंधत्वाचे अनेक कारणे आहेत. डोळयाला होणाटी इजा, बुब्बुळाला होणाºया जखमा, दिवाळीमध्ये असंरक्षितरित्या पेटविलेले फटाके, कुपोषणामुळे, इन्फेक्टान (जंतू प्रादुर्भाव), देवी, कांजिण्या आदी विकारामुळे, डोळयात काही केमिकल्स गेल्यास, अनुवांशिकता आदींमुळे अंधत्व येऊ शकते.
प्रश्न : नेत्रदान कोण करू शकतो?उत्तर : नेत्रदान केवळ मृत्यूनंतर करता येते,. बालकापसून वृध्दांपर्यंत कोणीही व्यक्ती नेत्रदान करू शकते, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती, ज्यांना चष्मा आहे, रक्तदाब, मधुमेह, दमा आदी विकार असलेले नागरीकही नेत्रदान करू शकतात.
प्रश्न : नेत्रदान कोण करू शकत नाही?उत्तर : एड्स, हिपाटेटिस (ल्व्हिरचे आजार), सेप्टिसिमिया (रक्तातील जंतू प्रादुर्भाव), ब्लड कॅन्सर आदी आजार असलेल्या व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत.
प्रश्न : इच्छापत्र भरले नसेल, तरीही नेत्रदान करता येते का?उत्तर : नेत्रदानासाठी इच्छापत्र भरणे आवश्यक आहे. मृत व्यक्तीने नेत्रदानाचे इच्छापत्र भरले नसेल तरीही नातेवाईकांना त्या व्यक्तीचे नेत्रदान करता येते. डोळयातील बुब्बळ मृत्यूनंतर सहा तासाचे आत काढावे लागतात. त्यामुळे मृत व्यक्तीचे नेत्रदान करावयाचे असल्यास लवकरात लवकर आरोग्य विभाग किंवा नेत्रपेढीशी संपर्क साधणे आवश्यक आहे.